आटपाडी / प्रतिनिधी
कोविडच्या संकटात माणुसकीला साद घालत कोविड मृतदेहावर खर्चासह अंत्यसंस्कार करण्यासाठी आटपाडीतील चंद्रकात दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत संस्थानी तयारी दर्शविली आहे. तहसीलदार व बीडीओना याबाबत त्यानी परवानगी मागितली असुन कोबिड मृतावर नि: शुल्क अत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र गदारोळ माजला आहे. अनेकांचा मृत्यु होत आहे. तर अनेकांना लागण होत आहे. आटपाडी तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २ हजाराच्या घरात पोहचली आहे. तर गुरुवारअखेर तालुक्यातील ३३ जणांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाने मयत झालेल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आटपाडी ग्रामपंचायत तरतूद नसल्याचे सांगत अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाईकांकडून १२ हजार रूपये घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
अशा कठीण समयी मात्र सामाजिक बांधिलकी जतन करण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत दौंडे व सहकाऱ्यानी सकारात्मक भूमिका मांडली आहे. श्रीमंत सोमेश्वर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, चौंडेश्वरी युवक मंडळ, चौंडेश्वरी पतसंस्था, आटपाडी विणकर सोसायटी यांच्या सहकार्यातून कोविड मृतावर स्वखर्चातुन अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
आटपाडी तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे त्याबाबत परवानगीसह मार्गदर्शनही मागण्यात आले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत दौडे, नितीन चोथे, सुरज हजारे, राजेंद्र दौडे, बालक डोईफोडे यांनी याबाबतचे पत्र प्रशासनाला दिले. गटविकास अधिकारी मनोज भोसले, विस्तार अधिकारी सुभाष बाड यांनी या भुमिकेचे स्वागत करून कोरोना संकटात सामाजिक बांधिलकी जतन करण्यासाठी मृताची जिम्मेदारी उचलण्याची तयारी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
Previous Articleकरमाळा शहरात आज एकही पॉझिटिव्ह नाही
Next Article जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 636 नवे कोरोना रुग्ण








