शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी : पिकांना फटका, साऱयांची उडाली तारांबळ
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्यानंतर 8 च्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. अचानक पाऊस झाल्याने साऱयांचीच दाणादाण उडविली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. सोमवारी साऱयांचीच तारांबळ उडाली होती. कार्यालयाला जाणारे तसेच बाजारहाटसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा शिडकावा होत होता. मात्र सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत या पावसाने झोडपून काढले. त्यानंतर काहीशी विश्रांती घेतली. दुपारनंतर मात्र बऱयापैकी उघडीप दिली होती. या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, भाजी विपेते, इतर व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती. ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्याने वळीव पाऊस पडल्याच्याच प्रतिक्रिया उमटत होत्या.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील कामे सुरू आहेत. मात्र या झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भर रस्त्यातच पाणी साचून होते. गटारी तुंबून रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱयांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाचा इतका जोर होता की त्यामधून छत्री घेऊन चालणेदेखील अवघड झाले होते. पाऊस कधी थांबतो, याचीच वाट अनेकांना पहावी लागत होती. मात्र पावसाची जोरदार संततधार दुपारपर्यंत सुरू होती. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी शिडकावा झाला आहे.
उपनगरांमध्येही पाणीच पाणी
सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे उपनगरांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. येळ्ळूर रोडवरील अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर या ठिकाणी गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. पाणी रस्त्यावरदेखील काही वेळ वाहत होते. आनंदनगर परिसरातही पाणी साचून होते. आनंदनगर आणि अनगोळ रस्त्याची खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते.
नेहरुनगर रस्त्यावर तुंबले पाणी
नेहरुनगर, महादेव मंदिर येथील गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे रस्त्यावर बराच वेळ पाणी साचून होते. यामधून वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. ही समस्या नित्याचीच झाली असून मागील वेळीही अशीच समस्या निर्माण झाली होती. याकडे महानगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पिकांना पुन्हा फटका
बटाटा, रताळी, सोयाबिन काढणीला व्यत्यय निर्माण झाला आहे. या पिकांना पुन्हा फटका बसला आहे. याचबरोबर पोसवलेल्या भातपिकाला धोका निर्माण झाला आहे. सध्या काही जातीची भाते कापणीसाठी आली आहेत. मात्र या पावसामुळे शिवारात पाणी झाल्याने ते पाणी गेल्याशिवाय भात कापणी करणे अशक्मय झाले आहे. शिवाय बटाटा, रताळी, सोयाबिन, भुईमूग काढणीत पावसाचा व्यत्यय निर्माण झाला आहे. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. काही भागातील शेतकऱयांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी पोसवणी झालेल्या भातपिकाला धोका निर्माण झाला आहे.
सकाळी दमदार…दुपारनंतर ऊन : दिवसभरात वातावरणातबराच बदल
मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन सोमवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र दुपारनंतर पुन्हा पाऊस कमी होऊन ऊन पहायला मिळाले. सकाळी ढगाळ वातावरणाबरोबरच दमदार पाऊस झाला. मात्र दुपारनंतर पाऊस ओसरून सूर्यकिरणे पहायला मिळाली. त्यामुळे दिवसभरात वातावरणात बराच बदल झालेला अनुभवायला मिळाला. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे जीवनमान काहीसे गारठले होते. मात्र दुपारनंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन ऊन पडले.









