65 लाखाचा निधी मंजूर : डांबरीकरण करण्यात येणार असल्याने नागरिकात समाधान
वार्ताहर / किणये
सोनोली ते कुदेमनी या संपर्क रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे गेल्या पाच-सहा वर्षांपासून दुर्लक्ष झाले होते. याचा वाहनधारक व शेतकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. अखेर या रस्त्याला मुहूर्त मिळाला आहे. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून सोनोली गावापासून दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
नुकतीच या रस्ताकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोनोली ते कुदेमनी फाटा हा संपर्क रस्ता सोनोली, यळेबैल, बेळगुंदी, राकसकोप, कुदेमनी व शिनोळी भागातील वाहनधारकांसाठी महत्त्वाचा ठरतो आहे. मात्र, प्रशासनाकडून हा रस्ता दुर्लक्षित होता. रस्त्यावर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे हा शिवारात जाणारा कच्चा रस्ताच असल्याचे चित्र दिसत होते.
या संपर्क रस्त्यावरील मुंगेत्री नदीच्या पुलाजवळ दरवषी पावसाळय़ात नदीचे पाणी रस्त्यावर येते व रस्त्याचा संपर्क तुटतो. रस्ता खराब झाला असल्यामुळे वाहनधारक व शेतकरीवर्ग वैतागून गेले होता. सोनोली गावापासून दीड किलोमीटर अंतराचा का होईना, रस्ता होणार असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
65 लाखाचा निधी मंजूर
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून 65 लाख रुपयांचा निधी या रस्त्याकामाला मंजूर झाला आहे. मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी युवराज कदम, ग्रा. पं. सदस्य रवळू पाटील, बाळू लोहार, ग्रा. पं. सदस्या वनिता पाटील, प्रकाश पाटील, वासुदेव पाटील, परशराम झंगरुचे, मनोहर झंगरुचे, भरमू पाटील, मारुती झंगरुचे, बाबू पाटील, लक्ष्मण कडोलकर आदींसह ग्रामस्थ, पंचकमिटीचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन गुरुनाथ पाटील यांनी केले.