ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबमधील 117 आणि उत्तरप्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान सुरु आहे. पंजाबच्या मोगा विधानसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका आपले नशीब आजमावत आहे. दरम्यान, याच मोगा मतदान केंद्रावर जाण्यापासून सोनू सूदला पोलिसांनी रोखलं आहे. तसेच त्याची कार जप्त करुन त्याला घरी पाठवलं आहे.
मोगा जिल्ह्याचे पीआरओ प्रभदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूद मतदारांवर प्रभाव टाकत असल्याची तक्रार अकाली दलाचे पोलिंग एजंट दिदार सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणूक आयोग आणि त्यांच्या टीमने सोनू सूदचा पाठलाग केला. त्याच्यावरील दिदार सिंह यांनी केलेले आरोप खरे ठरल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोनू सूदची कार जप्त करून त्याला दुसऱ्या गाडीने घरी पाठवण्यात आलं आहे. जर सोनू सूद घराबाहेर पडला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे सिंह यांनी म्हटले आहे.