ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गोठय़ांतील गुरे वाचली
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराच्या जवळच असलेल्या सोनगाव येथे अनेकदा बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये बिबटय़ाने सोनगाव येथील कदमवस्तीतील दहा कोंबडय़ांचा फडशा पाडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गोठय़ांतील गुरे वाचली. याबाबत वनविभागाकडे माहिती कळवली असल्याचेही त्यांनी सांगितले. बिबटय़ाचे ठसे आढळून आले आहेत.
सोनगाव, कुरणेश्वर, शाहुनगर या भागात बिबटय़ाचे अनेकदा दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाळीव कुत्र्यांवर हल्ले झाल्याच्या बाबीही सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी सोनगाव येथील प्रवीण कदम यांच्या वस्तीवर असलेल्या पाच कोंबडय़ांची जाग्यावर पखे पडल्याची त्यांना निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी एवढी चौकशी केली नाही. परंतु शनिवारी रात्री पुन्हा बिबटय़ा आला अन् त्याने खुराडय़ातील पाच कोंबडय़ावर पुन्हा डल्ला मारल्याने सगळा गलका झाला. बॅटरीच्या प्रकाशझोतात प्रवीण कदम यांनी पाहिले तर बिबटय़ा. त्यांनी लाईट लावून त्यास हाकलून लावण्यासाठी आवाज केल्यानंतर तो गेला. परंतु त्यामुळे दहशतीचे वातावरण झाले आहे. याची माहिती वनविभागाला त्यांनी दिली आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे जनावरे वाचल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वनविभागाचे निवृत्ती चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो होवू शकला नाही.








