सीडीएस रावत यांनी संसदीय समितीला दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय सैन्यात आगामी 3-4 वर्षांमध्ये 1 लाखाने मनुष्यबळ कमी करण्यात येणार आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी या लक्ष्याविषयी संसदेच्या स्थायी समितीला माहिती दिली आहे. जनरल व्ही. पी. मलिक सैन्यप्रमुखपदी असताना त्यांनी 50 हजाराने मनुष्यबळ कमी करण्याचा विचार चालविला होता. आमचे लक्ष्य पुढील 3-4 वर्षांमध्ये सुमारे एक लाखाने मनुष्यबळ कमी करण्याचे असल्याचे रावत यांनी स्थायी समितीसमोर बोलताना म्हटले आहे.
मनुष्यबळ कमी केल्याने शिल्लक राहणारा निधी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी खर्च केला जाणार आहे. सरकारनेही सैन्याला या रकमेचा तंत्रज्ञानात वापरासाठी आश्वासन दिले असल्याचे जनरल रावत म्हणाले. स्थायी समितीचा अहवाल मागील महिन्यात संसदेत सादर करण्यात आला होता.
टूथ टू टेल गुणोत्तर
भारतीय सैन्यात रिस्ट्रक्चरिंग (बदल) प्रक्रिया सुरू आहे. यात दिल्ली येथील सैन्य मुख्यालयातूनही अधिकारी कमी करत त्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात पाठविण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. स्थायी समितीला सैन्याच्या ‘टूथ टू टेल’ गुणोत्तराविषयीही माहिती देण्यात आली. टूथ टू टेल गुणोत्तर सैन्य मोहिमांमध्ये भाग घेणारे आणि त्यांच्यासाठी रसद पोहोचविणाऱया सैनिकांमधील गुणोत्तराला म्हटले जाते.
3-4 वर्षांमध्ये अंमलबजावणी
जर टेल म्हणजेच थेट सैन्यमोहिमांमध्ये भाग न घेणाऱया सैनिकांची संख्या अधिक झाली तर सैन्य मोहिमांसाठी आवश्यक सैनिकांच्या संख्येत घट होणर आहे. याचमुळे जर सैन्यमोहिमांसाठी आवश्यक सैनिकांची संख्या अधिक ठेवायची असल्यास टेल कमी करावी लागणार आहे. टूथ टू टेल गुणोत्तर कशाप्रकारे कमी करावी या स्थायी समितीच्या प्रश्नाला रावत यांनी उत्तर दिले आहे. 3-4 वर्षांमध्ये सुमारे एक लाखाने मनुष्यबळ कमी करण्याचे लक्ष्य आहे. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. सध्या भारतीय सैन्यात सुमारे 14 लाख सैनिक असल्याचे रावत म्हणाले.
मनुष्यबळ कपातीचा उद्देश
भारतीय सैन्य तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आहे. आम्ही पायदळावर (इंप्रेंटी सैनिक) लक्ष देत आहोत. तेच खऱया अर्थाने सीमेची देखरेख करतात. त्यांना आधुनिक रायफल देण्यास आमची प्राथमिकता आहे. आम्ही त्यांना अत्याधुनिक सर्व्हिलान्स यंत्रणा देऊ इच्छितो. सैनिकांना अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान पुरवू इच्छित असल्याचे जनरल रावत यांनी स्थायी समितीला सांगितले आहे.
आयबीजी संकल्पना
आम्ही आमचे लॉजिस्टिक टेल कमी करण्यासाठी आयबीजी (इंटीग्रेटेड बॅटल ग्रुप) संकल्पनेवर जात आहोत. इंटीग्रेटेड बॅटल ग्रुपमध्ये छोटय़ा तुकडय़ा असतील, ज्यांच्यामध्ये युद्ध लढण्याची क्षमता असेल, पण त्यांची लॉजिस्टिक टेल लहान करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक टेल कमी करण्यासाठी आम्ही त्याचे आऊटसोर्सिंग करू. ज्या कंपनीचे वाहन भारतीय सैन्यात वापरले जात आहे, त्यांना स्वतःच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्त करण्याऐवजी कंपनीच्या वर्कशॉपमधून दुरुस्त करण्यात येणार असल्याचे उदाहरण देत रावत यांनी भूमिका स्पष्ट पेली आहे.









