सैन्यप्रमुखांचा पाकिस्तान पंतप्रधानांना सल्ला : मायनस वन फॉर्म्युला स्वीकारा, स्वतः पद सोडा
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानाता राजकीय पारा खूपच वेगाने चढू लागला आहे. आतापर्यंत तटस्थ दिसून येणारे सैन्य पहिल्यांदाच अचानक सक्रीय दिसू लागले आहे. सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी शनिवारी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्याचे समजते. देशाला संघर्ष आणि हिंसेच्या मार्गावर नेणे सोडून द्या असे बाजवा यांनी इम्रान यांना बजावले आहे. पंतप्रधानपद सोडा, स्वतःच्या जागी स्वतःच्या पक्षातील अन्य नेत्याला पंतप्रधान पद द्यावे असे बाजवा यांनी इम्रान यांना सुचविले आहे. यालाच मायनस वन फॉर्म्युला म्हटले जात आहे.
पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार अफसार आलम आणि जफर नकवी यांनी बाजवा-इम्रान भेटीची माहिती दिली आहे. या भेटीवेळी आयएसआय प्रमुख नदीम अंजुम आणि राष्ट्रपती आरिफ अल्वी देखील उपस्थित होते. सैन्यप्रमुखांनी सिंध हाउसवर इम्रान यांच्या पक्षाच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारच जर हिंसेला चिथावणी देत असल्यास सैन्याला हस्तक्षेप करावा लागणार आहे. इस्लामाबादमध्ये 22 अन् 23 मार्च रोजी मुस्लीम देशांची संघटना ओआयसीची बैठक होणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघही पाकिस्तानच्या दौऱयावर आहे. यामुळे देशाची आणखीन बदनामी होईल असे काम सरकारने करू नये असे सैन्यप्रमुखांनी इम्रान यांना बजावले आहे.
ओआयसी बैठकीनंतर राजीनामा
पाक सैन्याधिकाऱयांनी इम्रान यांना ओआयसी बैठकीनंतर राजीनामा देण्यास सांगितले आहे. 11 मार्च रोजी इम्रान आणि सैन्यामधील मतभेद उघड झाले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात अपमानास्पद भाषेचा वापर न करण्याचा बाजवा यांचा सल्ला तेव्हा इम्रान यांनी धुडकावून लावला होता.
ओआयसीची बैठक
इम्रान खान विरोधात एकजूट झालेले विरोधी पक्ष संसदेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव मांडणार आहेत. तर ओआयसीच्या विदेश मंत्र्यांची बैठक मंगळवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये कुठलाच हिंसाचार घडू नये असा सैन्याचा प्रयत्न आहे. तर इम्रान यांचे पद वाचविण्यासाठी माजी सैन्यप्रमुख राहिल शरीफ यांनी बाजवा यांची भेट घेतली होती. परंतु शरीफ यांचे प्रयत्नही अयशस्वी ठरल्याचे समजते.
नवी समीकरणे जुळू लागली
25 किंवा 28 मार्च रोजी संसदेत इम्रान खान विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार असल्याचे मानले जात आहे. मतदानानंतर सरकार कोसळणार हे इम्रान आणि त्यांचे मंत्री ओळखून आहेत. याचमुळे मतदान टाळण्यासाठी शक्य ते प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. विरोधी पक्षांसोबत स्वतःच्या पक्षाच्या खासदारांना धमकाविले जात आहे. हे खासदार सध्या इस्लामाबादच्या सिंध हाउसमध्ये वास्तव्यास आहेत. विरोधकांकडे आता सुमारे 200 तर इम्रान यांच्या बाजूने 145 खासदार असल्याचे मानले जात आहे. बहुमताचा आकडा 172 आहे.
मायनस वन फॉर्म्यूला
विरोधी पक्ष आणि इम्रान यांच्या पक्षाच्या खासदारांना वजीर-ए-आझम (पंतप्रधान) म्हणून इम्रान खान नको आहेत. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे आणि देशात शक्तिशाली असलेले सैन्य कुठल्याही स्थितीत राजकीय स्थिती बिघडू नये यासाठी प्रयत्नशील आहे. याचमुळे सैन्याने मायनस वन फॉर्म्युला शोधून काढला आहे. इम्रान यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि पक्षातील अन्य नेत्याला पंतप्रधान होऊ द्यावे असा हा फॉर्म्युला आहे. परंतु इम्रान खान यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे.









