ड्रोन सिस्टीम तसेच रोबोट्ससाठी निविदा जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संवेदनशील सीमावर्ती भागांमध्ये देखरेख व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि शत्रूचा प्रत्येक डाव उधळून लावण्यासाठी भारतीय सैन्य आता स्वतःला सातत्याने अत्याधुनिक करत आहे. याचदरम्यान सैन्याने सैनिकांसाठी जेटपॅक सूट, नव्या पिढीची ड्रोन सिस्टीम आणि विशेष रोबोट्सच्या खरेदीसाठी निविदा जारी केल्या आहेत.
सैनिकांना 50 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उड्डाण करता यावे यासाठी 48 जेटपॅक सूट, 100 रोबोट्स अणि 130 फास्ट-ट्रक ‘टीथर्ड’ ड्रोन सिस्टीम्स सैन्याकडून खरेदी केल्या जाणार आहेत. जेटपॅक सूट हा सैनिकांसाठी सुरक्षित आणि नियंत्रित टेक-ऑफ तसेच लँडिंगयुक्त असावा, जो कुठल्याही दिशेत उतरण्यास सक्षम असावा असे सैन्याने म्हटले आहे. तर रोबोट्स हे 10 हजार फुटांच्या उंचीपर्यंत कमा करण्यास सक्षम असावेत. तर ड्रोन दीर्घकाळापर्यंत सीमारेषेपलिकडे नजर ठेवण्यासाठी उपयुक्त असावेत असे सैन्याने नमूद केले आहे.

सैन्याकडून आपत्कालीन खरेदीसाठी या निविदा जारी करण्यात आल्या आहेत. अलिकडच्या काळातील सीमेवरील तणाव पाहता भारताने हे पाऊल उचलले आहे. सैन्याने फास्ट ट्रक प्रोसिजर (एफटीपी) अंतर्गत तातडीच्या खरेदी अंतर्गत 48 जेट पॅक सूट खरेदी करण्यासाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजलही जारी केले आहे.
भारतीय सैन्य ‘रोबोटिक म्यूल’ म्हणजेच ‘रोबो खेचर’ खरेदी करणार आहे. सैन्याने सहाय्यक उपकरणांसोबत ‘100 रोबोटिक म्यूल’च्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. लडाखच्या दुर्गम भागात अंतिम मैलापर्यंत भोजन, उपकरणे आणि अन्य आवश्यक सामग्रीच्या पुरवठय़ासाठी सैनिकांना मोठी मेहनत करावी लागते. याचमुळे सैन्याने आता रोबोटिक म्यूल स्वदेशी कंपन्यांकडूनच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोबोटिक म्यूलची उंची 1 मीटर तर वजन 60 किलोपर्यंत असणार आहे.









