सेन्सेक्समध्ये 145 अंकांची वाढ, टाटा स्टील नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी पुन्हा वधारत नव्या उच्चांकासह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.
सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 145 अंकांच्या वधारासह 55,582.58 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 33 अंकांच्या तेजीसह 16,563.05 अंकांवर विक्रमी स्तरावर बंद झाला. टाटा स्टीलचा समभाग 4 टक्क्यापर्यंत वधारलेला होता. यासोबत बजाज फायनान्स, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह व रिलायन्स इंडस्ट्रिज हेही लाभात राहिले. दुसरीकडे बजाज ऑटो, मारूती सुझुकी, पॉवरग्रिड कॉर्प व अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग मात्र नुकसानीत हेते.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्स निर्देशांक एकावेळी 55,680 व निफ्टी निर्देशांक 16,585.45 या विक्रमी स्तरावर पोहचला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग तेजीसोबत तर 15 घसरणीसह व्यवहार करत होते. बजाज फायनान्सचे समभाग 2 टक्के तेजीसह व्यवहार करत होते. शेअर बाजाराला सोमवारी धातू आणि एफएमसीजी क्षेत्रातील समभागांचा आधार मिळाला होता. एनएसईवर एफएमसीजी निर्देशांक अर्धा टक्का तेजीत तर धातू क्षेत्राच्या निर्देशांकात एपीएल अपोलो टय़ुब्सचे समभाग 3 टक्के वाढले होते आणि वेदांताचे 1.50 टक्के इतकी तेजी राखून होते. बीएसईवर 3300 समभागांमध्ये व्यवहार होत होता, ज्यात 1 हजार 102 समभाग तेजीसह व्यवहार करत होते.
शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 240.35 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 593 अंकांच्या दमदार तेजीसह 55,437 आणि निफ्टी निर्देशांकही 164 अंकांच्या वाढीसह 16,529 अंकांवर विक्रमी स्तरावर बंद झाला होता. सोमवारी कृष्णा डायग्नोस्टीकचे समभाग लिस्ट झाले.








