आर्थिक समभागांतील सुधारणांचा प्रभाव : बजाज फिनसर्व्ह तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ात देशातील भांडवली बाजारात एकूण पाच सत्रांच्या प्रवासात चौथ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजार नफा कमाईमुळे घसरला होता. परंतु बाजाराने मागील आठ सत्रात आपली दमदार कामगिरी नोंदवल्याचे पहावयास मिळाले आहे. आठवडय़ातील पाचव्या दिवशी शुक्रवारी जागतिक बाजारातील चढ-उताराच्या प्रवासात आर्थिक समभागांतील सुधारणेमुळे सेन्सेक्स 86 अंकांनी वधारुन बंद झाला आहे.
दिवसभरातील चढउताराच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 85.81 अंकांनी वधारुन निर्देशांक 43,443.00 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 29.15 अंकांसह 12,719.95 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. यासह टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स आणि भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांचे समभागही तेजीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा भारती एअरटेल, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि टीसीएसचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
बाजारातील आर्थिक समभागातील सुधारणेच्या संकेतामुळे भांडवली बाजार नुकसानीतून सावरत असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये धातू आणि औषध कंपन्यांच्या समभागांनी तेजी नोंदवल्याचा लाभ सेन्सेक्सला झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग नव्याने वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वी लसीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा परिणामही बाजारावर होत आहे.
आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंट आणि जपानचा निक्की यांचा निर्देशांक घसरणीसह बंद झाला आहे. यामुळे आगामी काळात बाजारात कोणता कल राहणार यासंदर्भात चिंतेचे वातावरण दिसत होते.