पटना / वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री म्हणून बिहारमधून डच्चू दिल्यानंतर भाजपने सुशीलकुमार मोदी यांना बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता राज्यसभेची ‘लॉटरी’ लागली असून भाजपने शुक्रवारी त्यांची राज्यसभेचा उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यांना उमेदवारी देऊन भाजपने ‘एका दगडात दोन पक्षी’ मारले आहेत. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेतील ही जागा आहे. परंतु चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यानंतर भाजपने लोकजनशक्ती पक्षाला बाजूला सारले आहे. आता भाजप नेतृत्त्वाने रामविलास पासवान यांच्या जागी भाजप नेत्याची वर्णी लावत सुशीलकुमार मोदी यांना बढती आणि लोजपला धक्का ही दोन्ही उद्दिष्टय़े साध्य केली आहेत.
रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमधून रिक्त असलेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने गुरुवारी अधिसूचना जारी केली. त्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियाही सुरू झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी पत्र दाखल झाले नाही. आता भाजपने सुशील मोदी यांना आपला उमेदवारी जाहीर केल्याने ते लवकरच अधिकृतपणे अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार उमेदवारीसाठी अंतिम मुदत 3 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन माघार घेण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 ही असून 14 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे.









