कोल्हापूर / प्रतिनिधी
मराठी नाट्य़ व चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते (कै.) सूर्यकांत मांडरे यांच्या पत्नी सुशिला सूर्यकांत मांडरे (वय 95, रा. उज्वला हौसिंग सोसायटी, शाहू टोल नाका, उजळाईवाडी) यांचे सोमवारी पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात किरण व प्रकाश मांडरे हे दोन मुलगे, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (2 फेब्रुवारी) सकाळी 9.30 वाजता रक्षाविसर्जन आहे.
सुशिला मांडरे या पूर्वाश्रमीच्या सुशिला पिसे. त्यांचा सूर्यकांत मांडरे यांच्याशी 26 डिसेंबरल 1947 रोजी विवाह झाला. सूर्यकांत यांची मराठी चित्रपटातील कारकीर्द वयाच्या बाराव्या वर्षी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या बहिर्जी नाईक या चित्रपटातून बाल शिवाजीच्या भूमिकेने सुरू झाली. त्यांनी तब्बल शंभरहून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या. सुशिला यांनी प्रापंचिक जबाबदारी पार पाडताना सूर्यकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीतही साथ दिली. सूर्यकांत चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परगावी असताना संसाराची आणि मुलांच्या लालन पालन आणि शिक्षणाची जबाबदारी सुशिला यांनी खंबीरपणे पार पाडली. 1999 मध्ये सूर्यकांत यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या स्मृती जपत सुशिला यांनी सामाजिक कार्यातही योगदान दिले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. खासगी रूग्णालयात त्यांना दाखल केले होते. सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनेच्या महिला आघाडी स्मिता मांडरे-सावंत यांच्या त्या आजी होत.









