हत्या झाल्याची ऑडिओ क्लीप लिक कुटुंबाने मागितले स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या नाही तर ती आत्महत्याच असल्याचा खुलासा एम्सच्या पथकाने केल्यानंतर आता एका नव्या वादला तोंड फुटले आहे. या पथकातील डॉ. सुधीर गुप्ता यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून, त्यामध्ये त्यांनी सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा दावा केला होता. आता या ऑडिओ क्लीपवरून सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने ट्विट करत ‘एम्स’ने असा यूटर्न का घेतला, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सीबीआयने पुन्हा एकदा या क्लीपची सत्यता पडताळून सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
सुशांतच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल देणाऱया एम्सच्या समितीचे डॉ. सुधीर गुप्ता हे प्रमुख आहेत. त्या ऑड़िओ क्लीपमध्ये गुप्ता म्हणतात, ‘जेव्हा माझ्याकडे सर्वात आधी फोटो आले त्यावेळी फोटो पाहून सुशांतची हत्या झाली असे मला वाटले होते.’ काही दिवसांपूर्वीच सुशांतची हत्या नाहीतर आत्महत्याच झाल्याचा दावा एम्सने केला होता. आता डॉ. गुप्ता यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमुळे पुन्हा एकदा या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एम्सच्या रिपोर्टबाबत सुशांतचे कुटुंबही समाधानी नाही. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.









