प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पुन्हा काही गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. मात्र शुक्रवारी सुवर्णविधानसौध परिसरात सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. पहिल्या दिवशी सुवर्णविधानसौध परिसरात आंदोलनकर्त्यांनी गर्दी केल्याने सामाजिक अंतराचे भान राहिले नाही. कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी परिसरात आंदोलनासाठी गर्दी केल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडाला.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र सुवर्णविधानसौध येथे भरविलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. आंदोलनकर्ते सामाजिक अंतराबरोबरच तोंडावर मास्कदेखील वापरत नसल्याचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या कार्यक्रमातून पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढेल, अशी भीतीही सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.









