आरसीबी-मुंबई लढतीदरम्यान तणाव अगदी विकोपाला गेला. एकदा तर विराट कोहली युवा फलंदाज सुर्यकुमार यादवच्या अगदी समोर येऊन उभा ठाकला आणि जवळपास 15 सेकंद त्याच्याकडे रागाने पाहत राहिला. पण, जिद्दी सुर्यकुमार यादव देखील आपल्या जागेवरुन इंचभरही हटला नाही आणि विराटच्या नजरेला नजर भिडवत त्याने जशास तसे उत्तर दिले. विराट कोहली हा मैदानावर आपली आक्रमकता दाखवण्यासाठी ओळखला जातो. पण, सुर्यकुमारसारख्या युवा खेळाडूशी अशब्द स्लेजिंग करत त्याने काय मिळवले, हा प्रश्न ट्वीटरवरुन काही चाहत्यांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्सचा संघ धावांचा पाठलाग करताना 13 व्या षटकात उभयतात ही चकमक झडली होती.
सुर्यकुमारने यावेळी कव्हरवर तैनात विराटच्या दिशेने फटका लगावला आणि विराटने चेंडू थोपवला. त्यानंतर त्याने सुर्यकुमारकडे प्रदीर्घ कटाक्ष टाकला. सुर्यकुमार देखील अजिबात मागे हटला नाही. उभयतात एका शब्दाचीही बाचाबाची झाली नाही. पण, उभयतांची ही आक्रमकता स्लेजिंगचाच प्रकार होता आणि त्यामुळे उभय संघातील संघर्ष यामुळे आणखी उफाळून आला. आरसीबी विराटचा संघ व मुंबई ही रोहितची टीम अशा पार्श्वभूमीवर या दिग्गज खेळाडूतील कथित शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ही लढत आणखी संघर्षाने खेळली गेली. अर्थात, विराटवर याप्रकरणी नंतर टीकाही झाली.
एक युझर म्हणाला, विराटला हे वागणे शोभत नाही. तो महान खेळाडू आहे आणि त्याने खिलाडूवृत्तीला प्रथम प्राधान्य द्यायला हवे. आणखी एका चाहत्याने विराटच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला, हे योग्यच झाले, अशी टिपणी केली तर एका चाहत्याने अद्याप राष्ट्रीय पदार्पण न केलेल्या युवा खेळाडूला विराटने असे स्लेजिंग करणे योग्य नव्हे, असे मत व्यक्त केले. एक चाहता तर रागातून म्हणाला, विराटचे हे वागणे झिरो क्लास आहे.









