विधानसभेने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली : विविधांगी कार्याचा सर्वांनी केला गौरव
प्रतिनिधी / पणजी
एक बहुआयामी आणि तेवढेच अजातशत्रू व्यक्तीमत्व आमच्यातून निघून गेले आहे, अशा शब्दात राज्य विधानसभेने माजी सभापती सुरेंद्र सिरसाट यांना श्रद्धांजली अर्पण केली.
गोवा विधानसभेचे माजी सभापती असलेले सिरसाट यांचे सोमवारी रात्री म्हापसा येथे निधन झाले. त्यांना काल मंगळवारी विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती राजेश पाटणेकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, चर्चिल आलेमाव, यांच्यासह अन्य अनेक सभासदांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
सभापती म्हणून उत्कृष्ठ कारकीर्द
माजी सभापती तसेच तीन वेळा आमदार राहिलेले सिरसाट यांना गंभीर आजारामुळे म्हापसा येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात ते विधानसभेचे सभापती बनले, तसेच मंत्रीही बनून शिक्षणासारखे खाते त्यांनी सांभाळले. त्यांनी स्वतःही म्हापश्यात शैक्षणिक संस्था स्थापन केली. त्यामुळे बार्देश तालुक्यातील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली, यासारख्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या अडचणी समजणारे शिक्षक
मायकल लोबो यांनी आपण त्यांचे विद्यार्थी असल्याचे सांगितले. सिरसाट सर हे गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणारे व्यक्तीमत्व होते. शिक्षणक्षेत्रासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचेही लोबो म्हणाले.
प्रतापसिंह राणे यांनी, सिरसाट हे आपले राजकीय सहकारी असल्याचे सांगून एक चांगला वक्ता गमावल्याचे सांगितले. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील असेही ते म्हणाले.
सिरसाट हे बहुआयामी व्यक्तीमत्व
म्हापसाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी सिरसाट हे नाटय़कलाकार, साहित्यिक, सहकार, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रात वावरलेले बहुआयमी व्यक्तीमत्व होते, असे सांगितले. आपल्या कुटुंबाशी त्यांचा जवळचा संबंध होता व ते एक अजातशत्रू असे व्यक्ती होते, असेही ते म्हणाले.
सभापतींनी आदर्श घ्यावा : सरदेसाई
विजय सरदेसाई यांनी बोलताना, सभापती असताना सिरसाट सरांनी काही फुटीर आमदारांना अपात्र ठरविले होते. त्यांचा हा निवाडा सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला होता व जेव्हा जेव्हा पक्षांतरबंदी कायद्याखाली सुनावणी होते, तेव्हा त्यांच्या निवाडय़ाचा हवाला दिला जातो. सभापती पाटणेकर यांच्यासमोरही आता अपात्रता प्रकरणी सुनावणी आहे. त्यांनीही सुरेंद्र सिरसाट यांच्याकडून प्रेरणा घेऊन योग्य निवाडा द्यावा, असा सल्ला दिला.
शेवटी सर्वांनी एक मिनिट शांतता पाळून स्व. सिरसाट यांना श्रद्धांजली वाहिली.









