पोलिसांच्या कृतीला आमदार चर्चिल आलेमाव यांचे समर्थन असल्याचा दावा
प्रतिनिधी/ मडगाव
सुरावली येथे रविवारी पोलिसांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी कारवाई करून कार्यक्रम बंद पाडण्याच्या कृतीचा आम आदमी पार्टीने निषेध केला आहे. तसेच स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव यांनी पोलिसांच्या या कृतीवर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्यांचे या कृतीला समर्थन आहे हे स्पष्ट होते. अन्यथा येत्या 24 तासांत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आपले मत मांडावे, अशी मागणी यावेळी आपतर्फे करण्यात आली.
सध्या नाताळ सणानिमित्त विविध ठिकाणी संकल्पनांवर आधारित गोठय़ाचे देखावे तयार केले आहेत. सुरावलीतही असे गोठे दृष्टीस पडतात. सध्या राज्याला भेडसावणाऱया कोळसा व अन्य समस्यांवर आधारलेल्या संकल्पनांतून जनजागृती करण्यात येत आहे. ही व्यक्त होण्याची लोकशाही पद्धत आहे. मात्र असाच कार्यक्रम सुरावलीत सुरू असताना पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल आपचे नेते वेंझी व्हिएगस यांनी संताप व्यक्त केला. सध्या राज्यात सालाझारशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर पोलीस पाठविले होते. म्हणजेच आलेमाव यांचे या कृतीला समर्थन असणे साहजिकच आहे. कारण या सरकारला त्यांचा पाठिंबा आहे. तसे नसल्यास पोलिसांच्या सदर कृतीबद्दल आमदार आलेमाव मौन बाळगून का आहेत, असा सवाल व्हिएगस यांनी उपस्थित केला. नुकतेच सुरावलीवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पंचायत उमेदवार वानिया बाप्तिस्ता यांना निवडून दिले आहे. त्यामुळे आलेमाव आणि जि. पं. सदस्या बाप्तिस्ता यांनी या पोलीस कारवाईबद्दल आपली भूमिका व ते सुरावलीवासियांच्या सोबत आहेत की नाही हे स्पष्ट करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची ‘बी टीम’ आहे यावर शिक्कामोर्तब होईल, असे ते म्हणाले.
सुरावलीतील सदर कार्यक्रम ध्वनिप्रक्षेपक वापरण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्याने बंद पाडण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे. यापूर्वी रेल्वेमार्गावर ठाण मांडून आंदोलन करण्याचा जसा प्रकार घडला तसा प्रकार येथेही होऊ नये म्हणून पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता, असेही सांगण्यात आलेले आहे.








