उत्तर गोव्यातून आणले होते बैल
प्रतिनिधी / मडगाव
कोलवा पोलीस स्थानकाच्या हद्दित दर शनिवारी व रविवारी बैलांच्या व रेडय़ाच्या झुंजी आयोजित करण्याचा सपाटाच लागलेला आहे. शनिवारी सुरावली येथे बैलांच्या झुंजीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या झुंजीसाठी उत्तर गोव्यातून बैल दक्षिण गोव्यात आणले गेले होते. या झुंजीवर मोठय़ा प्रमाणात पैजा ही लागल्या होत्या.
उपलब्ध माहिती प्रमाणे, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे गोवा भेटीवर होते व त्यासाठी सर्व पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. हीच संधी साधून आयोजकांनी उत्तर गोव्यातून बैल आणून सुरावली येथे झुंजीच्sा आयोजन केले. सद्या समाजमाध्यमांवर या झुंजीचे व्हिडीयो व्हायरल झालेले आहेत. त्यात दोन्ही बैल एकमेकांना भिडल्यानंतर ते जखमी झाल्याचे ही आढळून येत आहे.
या बैलांच्या झुंजीवर पाच लाख रूपयांची पैज लावण्यात आली होती व त्यात ‘कोब्रा’ नामक बैलाने बाजी मारली. या झुंजीचे आयोजन पुन्हा एकदा कोलवा पोलिसांच्या आशीवार्दानेच झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. न्यायालयाने झुंजीवर बंदी घातली असली तरी कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत या झुंजी होत असून त्या रोखण्याकडे कोलवा पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून येत आहे.
दरम्यान, रविवारी पुन्हा रेडय़ाच्या झुंजीचे आयोजन झाले. दोन्ही रेडे हे दक्षिण गोव्यातील होते अशी माहिती उलपब्ध झाली. ही झुंज पाहण्यासाठी लोकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती.









