बेळगाव / सुशांत कुरंगी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार, उद्योग बंद करण्यात आले. नागरिकांनी कोरोनाच्या धास्तीने घरीच राहणे पसंत केले. परंतु नागरिकांना सुरळीत विजेचा पुरवठा करण्यासाठी विद्युत कर्मचारी अविरतपणे सेवा देत आहे. बेळगाव शहर, ग्रामीण व खानापूर या विभागात एकूण 750 कर्मचारी सेवा देत आहेत.
10 मिनीट जरी विजपुरवठा नसेल तर आपण बैचेन होतो. लगेच हेस्कॉमच्या तक्रार केंद्रावर फोन करतो. विज का गेली? किती वाजता येणार ? याची माहिती करून घेतो. सध्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरीच असल्याने त्यांना टीव्ही, मोबाईल, विद्युत उपकरणांसाठी विजेची गरज आहे. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी नागरिकांमधून घेण्यात येत आहे.
अंदाजे दीड लाख ग्राहकांना विजपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहरात विभागात 500 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर बेळगाव व खानापूर तालुक्मयात 250 कर्मचारी सुरळीत विजपुरवठा करीत आहेत. औद्योगिक वसाहती, व्यावसायिक इमारती बंद असल्याने काहीसा भार हलका झाला असला तरी घरगुती तक्रारींचे प्रमाण वाढत आहे.
येथे करा तक्रार
कोणत्याही कारणाकरीता हेस्कॉमच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. विजपुरवठा किंवा अन्य तक्रारींसाठी हेस्कॉमच्या 1912 या क्रमांकाशी संपर्क साधल्यास कर्मचारी दुरूस्ती करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयामध्ये येवून गर्दी करू नये. महत्त्वाचे काम असल्यास संबधिक ज्यूनिअर इंजिनिअर, सेक्शन ऑफिसर यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.
सेक्शनला 5 तर उपविभागाला 10 हजार
विद्युत विभागातील कर्मचाऱयांना संपूर्ण परिसरात फिरावे लागते. दररोज शेकडो नागरिकांशी त्यांचा संपर्क येत असतो. त्यांना कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरिता हेस्कॉमने मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. प्रत्येक सेक्शनला 5 हजार तर उपविभागाला 10 हजार रूपये मंजुर करण्यात आले आहेत. या रकमेतून त्या विभागातील कर्मचाऱयांना सॅनिटायझर व मास्क पुरविले जात आहेत.
एम. टी. अप्पन्नावर (कार्यकारी अभियंता, शहर)
कर्मचाऱयांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होवू नये याकरिता योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बेळगाव शहरात लाईनमन, मिटर रिडर, टेक्निकल असे 500 कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना सॅनिटायझर, मास्कचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रविणकुमार चिकाडे (कार्यकारी अभियंता, ग्रामीण)
बेळगाव व खानापूर तालुक्मयात एकूण 250 कर्मचारी काम करीत आहेत. ग्रामीण भागात कुठेही विजेच्या समस्या निर्माण होणार नाहीत, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. ग्राहकांपासून योग्य अंतर ठेवण्याबाबतही त्यांना माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱयांची सुरक्षितता ही प्रथमत: जपली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नाथाजी पाटील (उपाध्यक्ष, राज्य कर्मचारी संघ) पोलिस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्याबरोबरीनेच विद्युत कर्मचारी काम करीत आहेत. नागरिकांना सुरळीत विजपुरवठा मिळावा यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. त्यांचे कौतुक मात्र कुठेही होताना दिसत नाही. सरकारने इतर कर्मचाऱयांप्रमाणेच विद्युत कर्मचाऱयांचाही 50 लाखांचा विमा उतरवावा, अशी मागणी हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय मंडळाचे त्यांनी सांगितले









