शाळकरी मुलाला विचारलं की तुला काय खायला आवडतं, तर तो पिझ्झा असंच सांगण्याचे हे दिवस आहेत. गाव असो की शहर पिझ्झा खूपच स्पेशल पदार्थ ठरला आहे. पार्टीत किंवा मित्रमैत्रिणी जमल्यावर काय खायचे हा विचार केल्यावर पिझ्झा या शब्दावर सर्वांचे एकमत होते. आतापर्यंत तुम्ही मातीच्या भांडय़ात तयार केलेला ‘कुल्हड चहा’बद्दल ऐकला असाल, पण ‘कुल्हड पिझ्झा’ कधी ऐकला नसाल.
गुजरातच्या सुरत येथील एका दुकानात विकला जाणाऱया ‘कुल्हड पिझ्झा’ची सध्या चर्चा सुरू आहे. मातीच्या कपात वितळलेले चीज या पिझ्झामध्ये भरण्यात येते. एका युटय़ूब वाहिनीवर या कुल्हड पिझ्झाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. कुल्हड पिझ्झाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 23 लाख ह्यूज मिळाले असून पिझ्झाप्रेमींना अक्षरशः वेड लावलंय.
सुरतमधील ‘द कोन चाट’ या दुकानात हा कुल्हड पिझ्झा उपलब्ध आहे. हा पिझ्झा कशाप्रकारे तयार केला जातो हे सुद्धा व्हिडिओत दर्शविण्यात आले आहे. मातीच्या भांडय़ातील या कुल्हड पिझ्झाची किंमत केवळ 80 रुपये इतकी आहे. या कुल्हड पिझ्झाने सर्वच पिझ्झाप्रेमींना सुखद धक्का दिला आहे. युटय़ूबवर या व्हिडिओला आतापर्यंत 22 लाख 74 हजार 699 इतके ह्यूज मिळाले आहेत. तर 38 हजारांहून अधिक लोकांनी या कुल्हड पिझ्झाला लाइक्स दिले आहेत.









