वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
31 ऑगस्टपासून येथे सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत भारताचा युवा टेनिसपटू सुमीत नागलला पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये थेट प्रवेश देण्यात आल्याची माहिती स्पर्धा आयोजिकांनी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. नागल आता दुसऱयांदा अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सहभागी होत आहे.
2020 च्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत सहभागी होणारा सुमीत नागल हा भारताचा एकमेव टेनिसपटू आहे. मात्र भारताच्या प्रजनीश गुणेश्वरनला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळू शकली नाही. 22 वर्षीय नागलने गेल्यावर्षी या स्पर्धेत पहिल्या फेरीत खेळताना स्वित्झर्लंडच्या अनुभवी फेडरर विरूद्ध एक सेट जिंकला होता पण त्याला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. कोरोना महामारी समस्येमुळे ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रत्येक दोन दिवसांनी टेनिसपटूंची कोरोना चांचणी घेतली जाईल. पुरूष एकेरीच्या मानांकनात सर्बियाच्या जोकोव्हिकला अग्रस्थान देण्यात आले. फेडरर आणि नादाल हे अव्वल टेनिसपटू यावेळी या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे स्वीसचा वावरिंका, किरगॉईस, फॉगनेनी आणि मोनफिल्स या टेनिसपटूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.









