नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय मल्ल सुमित मलिकने दोन वर्षांच्या बंदीविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तेजक चाचणीत दोषी आढळून आल्याने जागतिक कुस्ती संघटनेने ही बंदी लादली असून बंदी स्वीकारणे किंवा त्याविरोधात दाद मागणे असे पर्याय सुमितकडे उपलब्ध होते. त्यानुसार, त्याने याविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला. बंदीची शिक्षा 6 महिन्यांची असावी, यासाठी तो प्रयत्न करणार आहे.
2 वर्षांच्या बंदीची शिक्षा कमी झाली तर पुढील वर्षी आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत जेतेपद कायम राखण्याचे त्याचे लक्ष्य आहे. 2018 राष्ट्रकुल सुवर्ण जिंकणाऱया मलिकवर जागतिक संघटनेने दुसऱया चाचणीतही दोषी आढळल्यानंतर बंदी घातली.
सुमित मलिकच्या निकटवर्तियांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, काही सप्लिमेंटस् व घेतलेली औषधे अमेरिकेला चाचणीसाठी पाठवली असून ज्या स्टिम्युलंटचे अंश आढळून आले, ते त्यात समाविष्ट असतील तर त्याचे सेवन अजाणतेपणाने झाले असल्याचे स्पष्ट होईल. त्यानुसार, बंदी कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतील, असा होरा आहे.
‘आम्ही वाडाकडून आणखी माहिती मागवली आहे. 2 वर्षांच्या बंदीविरुद्ध अपील करताना ताकदीने बाजू मांडण्यावर आमचा भर असेल. सुमित मलिक काही सप्लिमेंट घेत होता. शिवाय, एप्रिलमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यावर औषधोपचार सुरु होते. पहिल्या चाचणीत द्रव्याचे अंश अगदी किरकोळ प्रमाणात आढळून आले आहेत. आम्ही दुसऱया चाचणीचा सविस्तर अहवालही मागवला आहे’, असे मलिकच्या संपर्कात असलेल्या सूत्राने यावेळी सांगितले.
मलिकवरील बंदी दि. 3 जूनपासून लागू झाली आहे आणि त्याने बंदीविरोधात अपील जिंकले व ते 6 महिन्यांपर्यंत आणले गेले तर अशा परिस्थितीत तो बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत उतरु शकतो. ही स्पर्धा पुढील वर्षी 28 जुलैपासून खेळवली जाणार आहे. 125 किलोग्रॅम वजनगटातील या अव्वल मल्लाने मे महिन्यात सोफिया येथे संपन्न झालेल्या वर्ल्ड ऑलिम्पिक क्वॉलिफायर्सची अंतिम फेरी गाठत ऑलिम्पिक सहभाग निश्चित केला. मात्र, उत्तेजक चाचणीत दोषी आढळून आल्याने त्याची ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी हुकली आहे.









