ऑनलाईन टीम / ओडिशा :
संरक्षण विकास आणि संशोधन संघटनेने (डीआरडीओ) सोमवारी ओडिशातील बालासोर किनाऱ्यावर लांब पल्ल्याच्या सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडोची यशस्वी चाचणी केली. टॉर्पेडोच्या पारंपरिक श्रेणीच्या पलिकडे जाऊन पाणबुडीविरोधी लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली असल्याचे डीआरडीओने सांगितले.
चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व क्षमतांचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीसाठी डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळांनी विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे. नौदलाला लवकरच त्याची भेट मिळू शकते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलाने (आयएएफ) पोखरण पर्वतरांगांमधून स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरने प्रक्षेपित केलेल्या सेंट (स्टँड ऑफ अँटी-टँक) क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक एमएमडब्ल्यू शोधकाने सुसज्ज आहे, जे सुरक्षित अंतरावरून उच्च अचूक मारा करण्याची क्षमता प्रदान करते. हे शस्त्र 10 किमीपर्यंतच्या रेंजमधील लक्ष्यांना निष्प्रभ करू शकते.