प्रतिनिधी/ बेळगाव
फुलबाग गल्ली येथे मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास एक ट्रक थेट घरात शिरणार होता. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखल्याने हा अनर्थ टळला. घराची काही कौले यामध्ये फुटली. गल्ली अरुंद असतानाही अवजड वाहतूक करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही वाहतूक बंद न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या परिसरात एक पत्र्याचे दुकान आहे. त्या दुकानासाठी लागणारे साहित्य ट्रकमधून येत असते. परंतु यामुळे अरुंद गल्लीमध्ये अवजड वाहने घालण्यात येत आहेत. ट्रक वळविताना आजूबाजूच्या घरांना अपघात घडत आहेत. नागरिकांनी विरोध करूनही ही वाहतूक सुरूच आहे. मंगळवारी ट्रक वळविताना मोठा अनर्थ घडणार होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकची चावी काढून घेऊन पोलिसांना संपर्क साधला.
जर कोणताही अपघात घडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. असे प्रकार वारंवार घडत असून नागरिकांचा जीव धोक्मयात आहे. त्यामुळे ही अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.









