युतीवर चर्चा नसल्याचे दोन्ही नेत्यांकडून स्पष्ट : केजरीवाल आज आप कार्यकर्त्यांशी चर्चा करणार
प्रतिनिधी /पणजी
एका अत्यंत महत्वपूर्ण घडामोडीत मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी ‘आप’चे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. ही चर्चा युती करण्यासंदर्भात होती. तथापि ढवळीकर यांनी आपण केवळ सदिच्छा भेट घेतल्याचे जाहीर केले तर केजरीवाल यांनी सुदिन हे आपले मित्र आहेत, गोव्यात आलो व सहजपणे चर्चा केल्याचे सांगितले. परंतु सुदिन-केजरीवाल यांच्या भेटीने राज्यातील राजकीय चक्रे वेगाने फिरू लागली.
केजरीवाल दोन दिवसांच्या भेटीवर काल मंगळवारी गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी ‘आप’चे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मात्र कुणालाही न भेटता ते तेथून पणजीसाठी रवाना झाले. दोनापावला येथे हॉटेल सिदाद द गोवा येथे त्यांनी मुक्काम केला आहे.
ढवळीकरांचा भाजप-काँग्रेसला चकवा
मगो नेते सुदिन ढवळीकर हे केजरीवालांच्या आग्रहाखातर त्यांना भेटण्यास हॉटेलवर गेले व तिथे त्यांची सुमारे तासभर चर्चा झाली. त्यांच्या या भेटीचे वृत्त राज्यात सर्वत्र ‘ब्रेकींग न्यूज’ म्हणून पसरले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपने मगोकडे युती करण्यासाठी अलिकडच्या दिवसांत धिम्या गतीने प्रयत्न सुरू केले होते, तर दुसऱया बाजूने काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आघाडीने देखील प्रयत्न सुरू केले होते. मात्र दोन्ही पक्षांना चकवा देत सुदिननी थेट केजरीवाल यांच्याबरोबर चर्चा केल्याने गोव्याच्या राजकारणात आता तिसरी आघाडी तयार होतेय की काय असा प्रश्न उपस्थित झाला.
ढवळीकरांची पावले युतीच्याच दिशेने
केजरीवाल यांच्याबरोबर चर्चा करून सुदिन बाहेर पडताच पत्रकारांनी त्यांना घेरले असता आपण केवळ केजरीवालांची सदिच्छा भेट घेतली. दोन राजकारणी एकत्र आल्याबरोबर साहजिकच राजकारणावर चर्चा केल्याशिवाय कसे शक्य आहे. असा प्रतिसवाल त्यांनी केला. मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी देखील सुदिनबरोबर अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. आम्ही युती करण्याबाबत चर्चा केलेली नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली असता आपण सुदिनबरोबर चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु युती वा आघाडी करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.
सुदिननी केजरीवाल यांची भेट घेतल्याने काँग्रेस आघाडीत अस्वस्थता पसरली. त्याचबरोबर भाजप मध्येही प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मगो पक्ष केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाबरोबर युती करण्यासंदर्भात किती गंभीर आहे, याचा अंदाज भाजपला वा काँग्रेसला आलेला नसला तरी मगो-आप युती झाल्यास त्याचा फटका भाजप व काँग्रेसला देखील बसण्याची शक्यता आहे.
गरिबांना मोफत वीज देण्याची घोषणा?
केजरीवाल हे आज गोव्यातून नवी दिल्लीला जाण्याअगोदर राज्यातील ‘आप’ च्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार करुन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी ते सकाळी पणजीत पत्रकारांशी संवाद साधतील, आणि गोवा विकास दृष्टीक्षेप तथा गोवा अजेंडाचा पहिला भाग जाहीर करतील. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना तथा 300 युनिट वापरणाऱया घरगुती ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ते करतील, असा अंदाज आहे.
सरकारनेच केजरीवाल- कार्यकर्त्याची भेट रोखली : कुतिन्हो
मुख्यमंत्री केजरीवालांची भेट होऊ शकली नाही याला आपच्या उपाध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. शिष्टाचाराच्या नावाखाली व कोविड नियमांवलीचे कारण दाखवून केजरीवाल यांना शासकीय सुरक्षा पथक घेऊन गेले. केजरीवाल यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते दीड वाजल्यापासून थांबले होते. मात्र, त्यांना भेटू दिले नाही.
सीझेडएमपी जनसुनावणीसाठी कोविडचा नियम लागला नाही. नुवेत आपच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला तेव्हा त्या जमावाला कोविडचा नियम लागला नाही. केवळ मुख्यमंत्री केजरीवालांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना शिष्टाचार व कोविड नियम लागला, याचा अर्थ भाजपा सरकार आम आदमी पक्षाला जनतेकडून मिळत असलेल्या प्रतिसादाला किती घाबरत आहे हे स्पष्ट होते, असे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.









