भाजप दूर ः बसप सोबत ः आम आदमी पक्षाचे आव्हान
पंजाब विधानसभा निवडणुकीत यंदा शिरोमणी अकाली दलाचे अस्तित्व पणाला लागल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आम आदमी पक्षाचा राज्यातील वाढता प्रभाव पाहता अकाली दलाला स्वतःची मतदारपेढी शाबूत ठेवण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. प्रकाश सिंह बादल यांचे वय पाहता त्यांचे पुत्र सुखबीर सिंह बादल यांनाच आता पक्षाची धुरा सांभाळावी लागत आहे.
यंदाच्या निवडणुकीच्या मैदानात अकाली दलासोबत भाजप नाही. याचमुळे राजकीय समीकरणे काहीशी वेगळी असू शकतात. परंतु अकाली दलाने बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून स्वतःच्या निवडणूक मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या राजकीय कौशल्यासाठी ओळखले जाणाऱया सुखबीर बादल यांनी खूप आधीच पंजाबमध्ये निवडणुकीची तयारी चालविली होती. अकाली दल (संयुक्त)चे रणजीत सिंह ब्रह्मपुरा यासारख्या अनेक मोठय़ा नेत्यांना पक्षात परत घेत त्यांनी याचा पुरावा दिला आहे. त्यांनी पंजाबच्या राजकारणात विरोधी पक्षाची भूमिका पुन्हा प्राप्त केली आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या गोटात दाखल झालेल्या स्वतःच्या समर्थकांना परत आणून स्वतःचा पक्ष पुन्हा उभा करण्याची धडपड त्यांनी चालविली आहे.
अमेरिकेतून शिक्षण
9 जुलै 1962 रोजी पंजाबच्या फरीदकोटमध्ये जन्मलेले सुखबीर यांचे शिक्षण लॉरेन्स स्कुल, सनावर येथे झाले होते. त्यांनी 1980-84 पर्यंत पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए ऑनर्स आणि कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, लॉस एंजिलिसमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.
पक्षाची धुरा सांभाळली
सुखबीर हे प्रकाशश सिंह बादल यांचे पुत्र असून 2009-17 पर्यंत ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. तर 2008 पासून पक्षाची धुरा त्यांच्याच हातात आहे. शिरोमणी अकाली दलाच्या इतिहासात दुसरा सर्वाधिक कार्यकाळ (12 वर्षे) राहिलेले पक्षाध्यक्ष ते ठरले आहेत. त्यांच्यापेक्षा केवळ त्यांचे वडिल प्रकाश सिंह बादल हेच (13 वर्षे) या पदावर राहिले आहेत.
वाजपेयी मंत्रिमंडळात मंत्री
1996 मध्ये 11 व्या तर 1998 मध्ये 12 व्या लोकसभेसाठी ते निवडून आले होते. रालोआच्या दुसऱया शासनकाळात हा अकाली नेता 1998 ते 1999 पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री राहिला होता. 2001-04 दरम्यान सुखबीर हे राज्यसभा सदस्य होते. 2012 विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा निवडणूक जिंकली होती.
2017 मध्ये पराभव
परंतु सुखबीर बादल यांच्या नेतृत्वात अकाली दल 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 15 जागांवर विजयी होऊ शकला होता. या निवडणुकीत 77 जागा जिंकून काँग्रेसने बहुमत मिळविले होते. तर आम आदमी पक्षाला 20 आणि भाजपला 3 जागांवर विजय मिळाला होता.
भगवंत मान यांचा पराभव
सुखबीर बादल यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे भगवंत मान (खासदार संगरूर) आणि काँग्रेस नेते रवनीत सिंह बिट्टू (खासदार लुधियाना) यांना पराभूत केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुखबीर यांनी फिरोजपूर मदारसंघात विजय मिळविला होता.
2 पैलू महत्त्वपूर्ण
पंजाबच्या सत्तेवर परतू पाहणाऱया बादल कुटुंबासाठी दोन पैलू महत्त्वाचे ठरणार आहेत. बसपसोबत अकाली दलाची आघाडी जाट शिख आणि दलित मतांना स्वतःच्या बाजूने मोठय़ा प्रमाणात खेचू शकते. अकाली दल सरकारमध्sय दोन उपमुख्यंत्री असतील, यातील एक हिंदू तर एक दलित असेल अशी घोषणा सुखबीर यांनी पूर्वीच केली आहे. पंजाबच्या 3 कोटी लोकसंख्येत सुमारे 32 टक्के दलित आहेत. सुखबीर अद्याप शीख धर्माशी संबंधित सर्वात मोठे अकाली नेते आहेत आणि देशातील बहुतांश हिस्स्यांमध्ये गुरुद्वारा व्यवस्थापनावर त्यांचे नियंत्रण आहे. परंतु त्यांच्या शासनकाळातील अमली पदार्थ आणि वाळू तस्करी यासारखे मुद्दे अडचणीत आणणारे आहेत.









