59 हजार मुलींची टपाल खात्यात उघडण्यात आली खाती
प्रतिनिधी /बेळगाव
मुलींचे लग्न तसेच उच्चशिक्षणाची तजवीज करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली. या योजनेत पालकांनी आपल्याला शक्मय तितकी रक्कम भरायची असून त्यावर आकर्षक व्याज दिले जाणार आहे. बेळगाव पोस्ट विभागाने आतापर्यंत 59 हजार 393 मुलींची खाती उघडली असून यामुळे या मुलींचे भविष्य समृद्ध होणार आहे.
मध्यंतरीच्या काळात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी झाला होता. लग्न, शिक्षण यासाठीचा खर्च पालकांना परवडत नसल्याने मुलगी नको म्हणण्याची वेळ आली होती. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. देशातील राष्ट्रीयीकृत बँकांसह सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये ही योजना सुरू केली. यामध्ये पोस्ट कार्यालयाने आघाडी घेत गावोगावी सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडली.
पालक आपल्याकडील शक्मय तितकी रक्कम मासिक अथवा वर्षातून एकदाच भरत गेले. योजना सुरू होऊन सहा वर्षे झाली असून, या योजनेला भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे. केवळ बेळगाव पोस्ट विभागात 59 हजार खाती उघडण्यात आली आहेत. इतर विभागांपेक्षा बेळगाव विभागाने या योजनेतील खाती उघडण्यात आघाडी घेतली आहे.
कोण नावनोंदणी करू शकते?
सुकन्या समृद्धी योजनेसाठी 18 वर्षांखालील मुलीचे खाते काढले जाऊ शकते. पालकांना दोन मुली असतील तर दोघींच्या नावे बचत खाते उघडले जाऊ शकते. 21 वर्षांनंतर सुकन्या समृद्धी खाते बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातात. त्यापूर्वी शिक्षणासाठी एकूण रकमेतील 50 टक्के रक्कम काढता येऊ शकते. प्रत्येक वषी 250 रुपयांपासून 1 लाख 50 हजारपर्यंत खात्यामध्ये रक्कम भरता येऊ शकते.
सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याज दर
ही योजना केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने दरवषी याचा व्याजदर कमी-जास्त होत असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेवर हा व्याजदर अवलंबून असतो. सन 2015 मध्ये तब्बल 9.1 टक्के व्याजदर देण्यात आला होता. सध्या हा व्याजदर 7.6 टक्के असल्याची माहिती पोस्ट खात्यातर्फे देण्यात आली.
गावोगावी पोस्ट खात्यातर्फे जागृती
प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचावी, या उद्देशाने गावोगावी पोस्ट खात्यातर्फे जागृती केली जाणार आहे. आतापर्यंत 59 हजार नागरिकांनी आपल्या मुलींची सुकन्या योजनेमध्ये नोंदणी केली असून त्यामध्ये आपापल्यापरीने ते पैसे जमा करत आहेत. कोणत्याही पोस्ट कार्यालयात जाऊन नागरिक सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते काढू शकतात, अशी माहिती एच. बी. हसबी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
एच. बी. हसबी (अधीक्षक, बेळगाव पोस्ट विभाग)









