तालुका म. ए. समितीतर्फे माजी आमदार बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी / बेळगाव
सीमाभागाचा आधारस्तंभ, पालकत्व स्वीकारलेले माजी आमदार बी. आय. पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे सीमाभागाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठी भाषिकांचा आणि सर्वसामान्यांचा आधारवडच हरपला आहे. अशा या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या थोर नेत्याला सीमाप्रश्न सुटल्यावरच खरी श्रद्धांजली अर्पण होणार आहे, अशा भावनिक शब्दात माजी आमदार बी. आय. पाटील यांना तालुका म. ए. समितीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
मराठा मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन ज्या कार्यकर्त्यांना आपले विचार व्यक्त करायचे आहेत, त्यांनी करावे, असे आवाहन केले.
मराठा बँकेचे माजी चेअरमन आणि माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर म्हणाले, आम्ही सर्व संघटित झालो तरच त्यांना खरी श्रद्धांजली मिळणार आहे. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी यापुढे संघटित होऊनच लढा देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न निकालात काढणे गरजेचे आहे. सीमाप्रश्न सुटल्यानंतरच बी. आय. पाटील यांना खरी श्रद्धांजली मिळणार आहे.
तानाजी डुकरे म्हणाले, जनसामान्यांचा कल्याण करणारा नेता हरपला. यामुळे सीमाभागातील सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. नेहमीच त्यांनी किणये परिसरात कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अडीअडचणीत आलेल्यांना मदत केली आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
परशराम बेडका म्हणाले, बी. आय. पाटील म्हणजे एक सिंह होते. सिंह या चिन्हावरच त्यांनी निवडणूक लढविली. त्या सिंहाप्रमाणेच विधानसभेत त्यांनी डरकाळी मारून कर्नाटक सरकारला सीमाभागाची ताकद दाखवून दिली होती. त्यांच्या जाण्यामुळे सीमाभागाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सीमाप्रश्न सुटावा हे त्यांचे स्वप्न होते. आता ते स्वप्न आम्ही साऱयांनी पूर्ण करायचे आहे.
अशोक पाटील म्हणाले, सीमाप्रश्न कधी सुटेल याची तळमळ त्यांना लागली होती. जनतेची सेवा करण्यातच त्यांनी आयुष्य घालविले. सीमाभागातील जनतेवर वडिलांप्रमाणे प्रेम केले. साऱयांचेच छत्र हरपले आहे. पुन्हा असा नेता होणे शक्मय नाही. आता तरी साऱयांनी मतभेद विसरून म. ए. समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र येऊन लढा देऊन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.
याचबरोबर माजी उपमहापौर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, शिवाजी हंडे, बी. एस. पाटील, महादेव पाटील, परशराम पाटील, मनोहर हलगेकर, माणिक उघाडे, ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, शिवाजी शिंदे, रामचंद्र मोदगेकर यांनीही श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेला यल्लाप्पा बेळगावकर, बाळू मणगुतकर, सुरेश डुकरे, शट्टूप्पा चव्हाण, रमेश मेणसे, भोला पाखरे, नारायण किटवाडकर, अजित कोकणे, सुहास किल्लेकर, नाना पाटील यांच्यासह तालुक्मयातील म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









