म. ए. युवा समितीची एकनाथ शिंदेकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील 65 वर्षांपासून सीमावासिय जोखडात अडकले आहेत. अनेक आंदोलने झाली, तोडगे निघाले पण सीमाप्रश्न अद्याप सुटलेला नाही. अखेर हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून त्याला अद्याप हवी तशी गती मिळालेली नाही. मराठी भाषिकांवर आजही येथे अन्याय केले जातात, गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी सीमाप्रश्नासाठी स्थापन करण्यात आलेली उच्चाधिकारी समितीची बैठक त्वरीत बोलविण्याची मागणी म. ए. युवा समितीने महाराष्ट्राचे नगरविकास तथा सीमासमन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱयावर होते. यावेळी युवा समिती व शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी त्यांच्यासमोर सीमावासियांच्या व्यथा मांडल्या. सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार व खासदारांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेट घेवून त्यांना हा प्रश्न समजावून द्यावा, सीमाप्रश्नासाठी काम करणारे वकिल हरीष साळवे यांची भेट घ्यावी, सीमाभागातील मराठी भाषिकांना सर्व सुविधा, शिक्षणात व नोकरीत आरक्षण द्यावे, सीमासमन्वयक मंत्र्यांनी किमान महिन्यातून एकदा सीमाभागाला भेट द्यावी यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.









