समस्त सीमावासियांची शोकसभेत भावना व्यक्त : मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती-विविध संस्थांच्यावतीने शोकसभा
प्रतिनिधी /बेळगाव
सीमावासियांचा बुलंद आवाज म्हणून भाई एन. डी. पाटील यांची ओळख आहे. सीमाप्रश्नाचे कोणतेही आंदोलन वा महामेळावा असो भाई एन. डी. पाटलांचा सक्रिय सहभाग असायचाच. मराठी भाषिकांवर अन्याय झाला की कर्नाटक सरकारला एन. डी. पाटील जाब विचारायचेच. 1986 च्या लढय़ात त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यांच्या हयातीत सीमाप्रश्न सुटावा ही त्यांची इच्छा होती. परंतु ही इच्छा अपुरी राहिली. पण सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच भाई एन. डी. पाटील यांना खरी श्रद्धांजली होईल, अशी भावना मराठी भाषिकांनी शोकसभेत व्यक्त केली.
बुधवारी मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती व विविध संस्थांच्या माध्यमातून शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेमध्ये उपस्थित मान्यवरांनी भाई एन. डी. पाटील यांच्या आठवणी व विचार जागे केले. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रा. आनंद मेणसे, सहय़ाद्री सोसायटीचे अध्यक्ष एन. बी. खांडेकर, मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समितीचे गोपाळ पाटील, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील म्हणाले, भाईंच्या जाण्यामुळे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेतील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रयत शिक्षण संस्थेप्रमाणेच बेळगावमध्ये त्यांनी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळामध्ये अनेक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. मनोहर किणेकर यांनी सीमावासियांचा आधारवड हरपला असे सांगून सीमाचळवळीतील त्यांचे योगदान याविषयी माहिती दिली. रामचंद्र मोदगेकर यांनी अन्यायाविरुद्ध लढणारा, संघर्ष करणारा नेता हरपला, असे सांगितले.
एन. डी. पाटील यांचे विचार पुढील पिढीपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहेत, असे मत आप्पासाहेब गुरव यांनी व्यक्त केले.
प्रा. आनंद मेणसे म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील हे केवळ सीमाचळवळीचे नेते नव्हते तर कष्टकरी, शेतकरी, कामगार नेते होते. शेतकऱयांना हमीभाव मिळावा यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यांच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीची सुरुवात राष्ट्रसेवा दलापासून झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांनी काम करत समाजामध्ये बदल घडविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु सध्याची देशातील शेतकरी विरोधी परिस्थिती पाहता एन. डी. पाटील यांच्यासारख्या एका खंबीर विरोधकाची गरज आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शहर म. ए. समितीचे नेताजी जाधव, तालुका म. ए. समितीचे शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, ऍड. राजाभाऊ पाटील, नवहिंद सोसायटीचे चेअरमन उदय जाधव, आर. आय. पाटील, मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, युवा समितीचे श्रीकांत कदम, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण यांच्यासह विविध संघ व संस्थांचे मान्यवर यावेळी उपस्थित होते.









