खासदार धैर्यशील माने : राज्यातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती, पंतप्रधानांना भेटण्यासाठी पुढाकार घेणार

प्रतिनिधी / कोल्हापूर
सीमाप्रश्न हा केवळ सीमाभागातील मराठी बांधवांचा प्रश्न नाही तर अखंड महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेहमीच सीमाबांधवांच्या मागे खंबीरपणे राहिली आहे. आज पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सीमाबांधवांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. शिवसेनेच्या अजेंडय़ावर सीमाप्रश्न हा प्रमुख विषय आहे, त्यामुळे तो सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. यासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवून राज्यातील सर्व खासदारांनी एकत्रित येण्याची गरज आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान यांची राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी भेट घ्यावी, यासाठी आपण शिवसेनेच्या आढावा बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून प्रयत्न करू, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळास दिली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी खासदार धैर्यशील माने यांची त्यांच्या येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात सरचिटणीस किरण गावडे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, उपाध्यक्ष नारायण किटवाडकर, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल चौगुले, सरचिटणीस मनोज पावसे, मिथुन उसुलकर आदींचा समावेश होता.
सीमालढय़ाला व्यापक स्वरुप
सीमाप्रश्न केवळ सीमा भागातील मराठी बांधवांचा प्रश्न नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. हा प्रश्न सुटला पाहिजे. आपले मराठी बांधव आपल्याजवळ आले पाहिजेत, अशी राज्यातील तमाम मराठी माणसांची इच्छा आहे, असे सांगत खासदार माने म्हणाले, सीमा लढय़ातील अग्रणी (कै.) बाबुराव ठाकुर यांनी सीमालढय़ाला बळ दिले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी सीमा लढय़ाची चळवळ मोठय़ा कष्टाने, हिमतीने पुढे रेटली. अनेक संघर्षाचे प्रसंग आले मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. सर्वांना बरोबर घेऊन सामालढय़ाला व्यापक स्वरुप
दिले, असे खासदार माने यांनी सांगितले.
सर्व खासदारांनी एकत्र आले पाहिजे
सीमाबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांनी एकत्र आले पाहिजे. कुणाची राजकीय अडचण होत असेल तर ती या प्रश्नापुरती बाजूला ठेवून एकजूट दाखविण्याची गरज आहे, अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. सीमा भागातील जनतेला न्याय मिळवून देणे ही तर माझी नैतिक जबाबदारीच आहे. मी शक्य तितक्या खासदारांना संसदेमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना एकत्र करून केवळ आणि केवळ सीमाप्रश्नावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची आवश्यकता आहे. यासाठी पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे सर्व पक्षांना आवाहन करण्याची विनंती करणार आहे.
शिवसेनेच्या आढावा बैठकीत पक्षप्रमुखांकडेही या प्रश्नी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार माने यांनी स्पष्ट केले.
भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनाही निवेदन
भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनाही म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी याबाबत चर्चा करून प्रश्न लवकर कसा सुटेल याविषयी चर्चा घडवून आणावी, अशी विनंती शिष्टमंडळाने महाडिक यांच्याकडे केली. या प्रश्नावर भाजपही सकारात्मक आहे. सीमाप्रश्नी समितीचे तत्कालिन समन्वयक व भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांनी लक्ष घातले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.









