डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याने गंभीर दखल : केरी, दोडामार्ग, पत्रादेवी येथे चाचणी सुरु,चाचणी निगेटिव्ह आली तरच गोव्यात प्रवेश
प्रतिनिधी /पणजी
गोव्याशेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात कोरोना डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्यानंतर त्याची गंभीर दखल गोवा सरकारने घेतली असून राज्याच्या प्रमुख सीमांवर गोव्यात प्रवेश करणाऱयांची रॅपिड अँटीजेन चाचणी सुरु केली आहे. चाचणी निगेटिव्ह आली तरच गोव्यात प्रवेश देण्यात येतो. पॉझिटिल्ह चाचणी आल्यास सीमेवरुनच त्यांची परत पाठवणी केली जात आहे. या चाचणीस 15 ते 20 मिनिटे लागत असल्याने सीमेवर वाहनांसह चालकांची गर्दी दिसून येत असल्याचे चित्र आहे. दोन खासगी लॅबना या चाचणीसाठी अनुमती देण्यात आली आहे. दरम्यान राज्यात सुरु असलेल्या कर्फ्यूत आणखी वाढ होणार आहे.
केरी, दोडामार्ग, पत्रादेवी येथे चाचणी सुरु झाली असून काणकोण येथे आज शनिवारपासून चालू होणार असल्याचे सांगण्यात आले. दिवस-रात्र ही चाचणी होणार असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली.
डेल्टा प्लसला रोखण्यासाठी उपाययोजना
सध्या गोव्यात तरी डेल्टा प्लस कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत, परंतु शेजारील दोन्ही राज्यात त्याचे रुग्ण असल्याने त्यांचा संसर्ग झालेले लोक गोव्यात येण्याचा आणि तो संसर्ग गोव्यात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तो रोखण्यासाठी सदर उपाययोजना करण्यात आली आहे.
आरोग्य खाते एकंदरीत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. डेल्टा प्लस कोरोनापासून सावध राहण्याचा इशारा केंद्र सरकारतर्फे देण्यात आला असून त्याची दखल घेवूनच राज्य सरकारने ही पावले उचलली आहेत. सीमेवर त्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहेत, असे सुत्रांनी सांगितले. गोव्यात प्रवेश करण्याच्या ज्या काही इतर वाटा, मार्ग आहेत तेथेही अशी चाचणी करण्याचा विचार चालू असून ते जर शक्य होत नसे तर तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा इरादा असल्याचे सांगण्यात आले. या कामामुळे पोलीस खात्यावर ताण पुन्हा एकदा वाढला आहे.
कर्फ्यूच्या कालावधीत होणार वाढ
कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या विद्यमान कर्फ्यूचा कालावधी सोमवारी 28 रोजी संपुष्टात येत असला तरीही राज्यात अद्याप दिलासादायक स्थिती नसल्यामुळे कर्फ्यू कालावधी आणखी काही दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.
अद्याप रोज 300 च्या आसपास बाधित
राज्यात अद्याप रोज 250 ते 300 च्या आसपास कोरोनाबाधित तसेच 6 ते 11 जणांचे बळीही जात आहेत. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरू शकते. भरीस कर्फ्यूसंबंधी सरकारकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच सरकारचे काही निर्णय आणि गोपनीय माहिती बडय़ा पॅसिनो कंपन्यांपर्यंत पोहोचते व त्यांच्याकडून ती माहिती थेट स्टॉक एक्स्चेंजलासुद्धा कळविण्यात येते. यापूर्वी तसा प्रकार उघडकीस आला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लावलेला सात दिवसांचा कर्फ्यू कालावधी संपण्याआधीच डेल्टा या पॅसिनो कंपनीने राज्यात आणखी 15 दिवसांनी कर्फ्यू वाढणार असल्याचे मुंबई स्टॉक एक्स्चेंजला लेखी कळविले होते. सदरचे पत्र पत्रकारांच्या हाती लागल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली होती. सरकारची अंतर्गत गोपनीय माहिती बाहेर पोहोचतेच कशी? अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती.
कर्फ्यू वाढीबाबत मुख्यमंत्र्यांकडून संकेत
त्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत, ’राज्यात विद्यमान कर्फ्यू कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे का’? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, ’योग्यवेळी तो निर्णय जाहीर करण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यानही मुख्यमंत्र्यांना तोच प्रश्न विचारण्यात आला असता तेव्हाही त्यांनी कर्फ्यू मुदतवाढीचे संकेत दिले होते. त्यावरून कर्फ्यूची मुदत आणखी वाढविली जाणार हे स्पष्ट झाले आहे. शेजारील सिंधुदुर्ग जिह्यात ’डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या व्हायरसचा गोव्यात शिरकाव होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी व उपाययोजना घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने राज्याच्या सीमेवर प्रत्येक व्यक्तीचे कडक क्रीनिंग करण्यासही प्रारंभ झाला आहे.
लवकरच ओपीडी पूर्ववत सुरू होणार
मार्चमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर गोमेकॉसह अन्य सरकारी इस्पितळे आणि आरोग्य केंद्रांतील बहुतेक बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) बंद करण्यात आले होते. सध्या कोरोना लाट ओसरत असल्याचे दिसून आल्यामुळे या ओपीडी पुन्हा सुरू करण्याची तयारी चालली आहे. कोविड उपचारांसाठी यापुढे बांबोळी येथील सुपर स्पेशालिटी ब्लॉक आणि मडगाव येथील जिल्हा इस्पितळ अशी दोनच इस्पितळे वापरण्यात येणार असल्यामुळे या ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









