नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाच्या दहावी आणि बारावीची परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होणार आहे. या परीक्षा 10 जून 2021 पर्यंत पूर्ण केल्या जातील. त्यानंतर 15 जुलै 2021 पर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी 1 मार्च 2021 पासून प्रयोग परीक्षा (प्रॅक्टीकल एक्झाम) सुरू केल्या जाणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा गुरुवारी जारी करण्यात आल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
सीबीएसई बोर्डाच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अधिकृत वेबसाईटवरून वेळापत्रक डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या कोणत्या तारखेला कोणत्या विषयासाठी परीक्षा घेण्यात येईल, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. सीबीएसई बोर्ड लवकरच दोन्ही वर्गातील बोर्ड परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करेल.
सीबीएसई बोर्डाने चालूवर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दोन्ही वर्गांसाठी अभ्यासक्रम 30 टक्के कमी केला आहे. बदललेल्या पॅटर्नवर आधारित 2021 ची परीक्षा घेतली जाणार आहे. बोर्डाच्या परीक्षा फक्त सुधारित अभ्यासक्रमावर घेतल्या जातील. याशिवाय पेपर पॅटर्नमध्येही बोर्डाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सदर बदल विद्यार्थ्यांना संबंधित शाळांकडून कळविला जाणार आहे. तसेच यासंबंधीची माहिती वेबसाईटवरही उपलब्ध करण्यात येणार आहे.









