प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनावरील भारत बायेटेकच्या ५०० लसी सीपीआरमध्ये दाखल झाल्या आहेत. सोमवारी या लसिकरणासाठी राज्याच्या आरोग्य सचिवांच्या परवानगीची प्रतीक्षा होती. रात्री उशिरा परवानगी मिळताच मंगळवारी कोणत्याही क्षणी कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सीपीआरमधील क्रोम वॉर्डशेजारील दोन रूम लसिकरणासाठी सज्ज आहेत. लसीकरणासाठी निगडीत स्टाफही तयार आहे. फक्त परवानगीची प्रतिक्षा असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गोवा येथील क्रोम कंपनीने गोव्यात तिसऱया टप्प्यातील प्रायोगिक लसीकरण सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी क्रोम कंपनीने चर्चा केली. त्यातून १७०० जणांना लसीकरणाची यादी बनवली. आयसीएमआरची तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक लसीकरणासाठी परवानगी मिळाली आहे. फक्त वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांची परवानगी रात्री उशिरा मिळण्याची शक्यता आहे. सचिवांची परवानगी मिळताच सीपीआरमध्ये कोणत्याही क्षणी या लसीकरणाला सुरूवात होणार आहे.
क्रोम कंपनीच्या माध्यमातून भारत बायोटेकचे ५०० कोव्हॅक्सिन सीपीआरमध्ये दाखल झाले आहे. लसीकरणासाठी सीपीआर हॉस्पिटलच्या जुन्या इमारतीत क्रोम वॉर्ड आहे. या वॉर्डमधील पश्चिमेकडील दोन रूम लसिकरणासाठी सज्ज ठेवल्या आहेत. सीपीआरमधील संशोधन विभागाच्या रूममध्ये दिवसभर कोरोना योद्ध्यांच्या यादीवर अंतीम हात फिरवला जात होता. या रूममध्ये सोमवारी निदान एकातरी कोरोना योद्ध्याला लस देण्याचे नियोजन होते. पण परवानगी न मिळाल्याने आता मंगळवारीच तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक लसीकरणाला सुरूवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात १० दिवसांत एक हजार जणांना ही लस दिली जाणार असल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
खासगी डॉक्टरांना नोंदणीचे आवाहन
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पल्स पोलिओ लसीकरणासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत कोव्हॅक्सिन लसिकरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शासकीय स्तरावर कार्यरत डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफची यादी तयार आहे. त्याची माहिती कोव्हॅक्सिन ऍपमध्ये भरली आहे. पण जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांकडून याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. जनरल प्रॅक्टिशनर्सनी लसीकरणासाठी नोंदणी करावी, यासंदर्भातील फॉर्म ऑनलाईन भरावा, असे आवाहन आरोग्य विभागाने करावे, अशी सुचना जिल्हाधिकारी देसाई यांनी बैठकीत केली.
जिल्ह्यातील आयुर्वेदिक, युनानी आणि अन्य वैद्यकीय शाखांतील क्लिनिकच्या डॉक्टरांनी त्यांची नोंदणी करावी, त्यांच्याकडून इच्छुक असतील तर त्यांचीही माहिती आरोग्य विभागाला द्यावी, ही माहिती संकलित करण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत.









