खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांचे मत
पुणे / प्रतिनिधी :
सीएए, 370 मुद्दा कोणताही असो विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय आहे. ‘सवाल करो, बवांल मत करो’ या मताचा मी आहे. प्रश्न विचारणे हे जीवंत लोकशाहीचे द्योतक आहे. शिस्त, समाधी आणि ज्ञान या त्रिसूत्रीवरच भारत प्रगती करु शकेल. कोणत्याही विचारधारेची ही त्रिसूत्री हा पाया पाहिजे. कोणत्याही घटनेचे विश्लेषण होऊन सामजिक माध्यम फॉलो झाले पाहिजे, असे मत लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी व्यक्त केले.
श्री पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकॅडमी, पूर्णवाद युवा फोरम आणि जीवन कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यावषीचा ’युवक क्रांतीवीर’ पुरस्कार लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना ऍड. विद्यासागर डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी नामग्याल बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ज्ये÷ उद्योजक नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अकॅडमीचे अध्यक्ष ऍड.राहुल संत, सुर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, एस.एन.बी.पी.शिक्षण संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भोसले, डी.वाय.पाटील शैक्षणिकसंस्थेचे प्रमुख डॉ. पी.डी.पाटील, पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष ऍड. गणेश पारनेरकर, लक्ष्मीकांतदादा पारनेरकर आणि सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जीवनकला मंडळातर्फे दरवषी दिला जाणारा ‘प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा.सुभाषचंद्र प्रतापराव भोसले यांना, तर राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त आणि सती मनकर्णिका माता पारनेरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिला जाणारा मातृधर्म पुरस्कार मंगला चंद्रशेखर इटकर यांना प्रदान करण्यात आला.
जाम्यांग त्सेरिंग नामग्याल म्हणाले की, तसे पाहिले गेले तर आम्ही सीमेचे रक्षक आहोत. गेल्या 70 वर्षांपासून आमचे भारतीय आस्तित्व नव्हते. 370 कलमाद्वारे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला ओळख मिळाली. काश्मिर ते कन्याकुमारी अशी ओळख होण्यापेक्षा लडाख ते कन्याकुमारी अशी ओळख झाली पाहिजे.
मुंबई-दिल्ली मध्ये पर्यटनला आले असता आमच्या चेहऱयावरुन तुम्ही चिनी, नेपाळी आहात का असा प्रश्न आमच्याच भारतीय बंधुंकडून विचारला जातो. आम्ही लडाखवासीय भारताचाच भाग असून, आम्ही आमच्या बांधवांच्या परिचयाचे नाहीत, या जाणीवेने मनाला यातना होतात. भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्ध लडाखच्या भूमीवरून लढले गेले. त्यामुळे ‘युद्धभूमी’ अशी देखील एक ओळख तिला प्राप्त झाली आहे. पंरतू, लडाखची ओळख युद्धभूमी नव्हे, तर बुद्धभुमी अशी व्हावी, अशी इच्छाही नामग्याल यांनी व्यक्त केली.









