भिंतींना बुरशी आली तरी दुर्लक्ष : ज्युनिअर डॉक्टरांची अरेरावी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत रुग्णसेवेसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील यंत्रणा तत्पर ठेवण्याची गरज असते. मात्र, ही यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली असून खासकरून आपत्कालीन विभागच रोगग्रस्त झाला आहे. नकारात्मक मनस्थितीच्या डॉक्टरांच्या अरेरावीमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
या विभागात खासकरून ज्युनिअर डॉक्टरांचा कारभार चालतो. ज्या मेडिकल ऑफीसरांवर जबाबदारी आहे. त्यांच्या अनुपस्थितीत येथील ज्युनिअर डॉक्टर पूर्णपणे कारभार सांभाळतात. रुग्णांच्या सोयीपेक्षा त्यांची गैरसोय कशी होईल, याची व्यवस्था केली जात आहे. या इमारतीला बुरशी लागली आहे. संपूर्ण वातावरण अस्वच्छ आहे, अशा परिस्थितीत उपचारासाठी या ठिकाणी येणारे रुग्ण कसे बरे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बुधवारी सायंकाळी येथील कारभार ज्युनिअर डॉक्टरांवरच होता. अंमलीपदार्थ विक्री प्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या एका वृद्धाला पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन आले होते. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी कशी करायची याची कसलीच माहिती नसूनही दोघा हेकेखोर ज्युनिअरनी न्यायालयाकडून पत्र घेऊन या तरच वैद्यकीय तपासणी केली जाईल, असे सांगत पोलिसांना पिटाळले.
गेल्या वषी कोरोनाच्या काळात याच इस्पितळाने रुग्णांवर उत्तम सेवा दिली आहे. तरीही गैरसोयी, काही जणांचा हेकेखोरपणा आदींमुळे सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार वादग्रस्त ठरला होता. रुग्णवाहिका पेटविण्याबरोबरच सिव्हिलवर दगडफेक करण्याचा प्रकारही घडला होता. निव्वळ काही जणांच्या हेकेखोरपणामुळेच उदेक वाढला होता. पुन्हा सिव्हिलमध्ये तशीच परिस्थिती पाहायला मिळते.
बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी सर्वसामान्यांचा उदेक वाढण्याआधीच हेकेखोर ज्युनिअर डॉक्टरांना तेथून इतरत्र हलवावे, अशी मागणी केली जात आहे. आपत्कालीन विभागात अपघात, हाणामारीतील जखमी, सर्पदंश, भाजून गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. येथील सर्व कारभार नकारात्मक मनस्थितीच्या ज्युनिअरांवर सोपविण्यात आला असून त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे.









