कोरोना चाचणीसाठी विद्यार्थ्यांनी केली गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सिव्हिल हॉस्पिटलचा ओपीडी (बाह्य रुग्ण सेवा) विभाग बंद करण्यात आला होता. त्यामुळे गोरगरीब जनतेला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. ओपीडी विभाग सुरू करावा, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता तब्बल 8 महिन्यांनंतर सोमवारपासून ओपीडी विभाग सुरू करण्यात आला असून गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
ओपीडी विभाग सुरू करण्यात आल्यामुळे संपूर्ण जिह्यातील रुग्ण आता सिव्हिल हॉस्पिटलकडे उपचारासाठी येऊ शकतात. सध्या येथील डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. ओपीडी विभाग सुरू केल्यानंतर आता इतर विभागही टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे बिम्सच्या संचालकांनी स्पष्ट केले आहे. ओपीडी विभाग सुरू केला तरी सॅनिटायझर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तेव्हा सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने स्वच्छतेकडे आणि सॅनिटायझरकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
आरोग्य विभागाने या ठिकाणी औषधांचीही उपलब्धी करावी. याचबरोबर तातडीने इतर शस्त्रक्रिया करण्यासही सुरुवात करावी, अशी मागणी रुग्णांतून होत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील दोन्ही ओपीडी विभाग सुरू झाले आहेत. मात्र आता गर्दी होणार असल्याने आणखी किमान एक-दोन ओपीडी सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांची रॅपिड टेस्टसाठी गर्दी
महाविद्यालये सुरू झाली आहेत. महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच हजर होण्यासाठी कोरोना रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलकडे मोठी गर्दी केली आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी तातडीने रॅपिड टेस्टबरोबरच त्यांचा अहवालही द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे. त्यादृष्टीने सिव्हिल प्रशासनाने पाऊल उचलावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे.









