देशातील पहिली मानवी चाचणी, भारती हॉस्पिटलमध्ये दुसऱया टप्प्यातील प्रयोग, ‘कोव्हिशिल्ड’मुळे कोरोनाचे विघ्न दूर होण्याची आशा
पुणे / प्रतिनिधी
सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीच्या दुसऱया टप्प्याअंतर्गत भारती हॉस्पिटलमध्ये दोन स्वयंसेवकांना बुधवारी ही लस देण्यात आली. या दोघांनाही 0.5 एमएलचा डोस देण्यात आला असून, अर्ध्या तासाच्या निरीक्षणानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. देशातील कोरोना लसीची ही पहिली मानवी चाचणी असून, या लसीमुळे कोरोनाचे विघ्न दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोव्हिशिल्ड ही लस विकसित करण्यात येणार असून, सिरमने या लसीच्या उत्पादनासाठी ऍस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्विडिश कंपनीशी करार केला आहे. या लसीची क्षमता व सुरक्षितता तपासण्याच्या दृष्टीने चाचण्या केल्या जात आहेत. केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेने दुसऱया व तिसऱया टप्प्यातील चाचणीसही मान्यता दिली आहे. त्यानुसार लसीच्या 17 विविध शहरांमध्ये चाचण्या होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारती हॉस्पिटलमध्ये बुधवारी या लसीच्या देशातील पहिल्या मानवी चाचणीस सुरुवात झाली.
सहा महिन्यांत यशस्वितेवर शिक्कामोर्तब
दुसऱया टप्प्यासाठी एकूण पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. मात्र, पाचमधील तिघांचा अँटीबॉडीजचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना या चाचणीतून वगळण्यात आले. तर एका 32 वर्षीय व दुसऱया 47 वर्षीय पुरुषास डोस देण्यात आला. या दोन्ही स्वयंसेवकांना पुढच्या टप्प्यात 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. 90 दिवसांनी फोनवर त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली जाईल. तर 180 दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावले जाईल. त्यानंतर सहा महिन्यांमध्ये या लसीच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पुढच्या सात दिवसांमध्ये 25 जणांना ही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली.
प्रयोगात सहभाग होण्याचा आनंद
यासंदर्भात बोलताना संबंधित 32 वर्षीय तरुण म्हणाला, कोरोनावरील लसीची मानवी चाचणी होणार असल्याचे समजल्यानंतर आपण त्याकरिता हॉस्पिटलमध्ये नावनोंदणी केली. विविध तपासण्यांनंतर यासाठी आपण पात्र असल्याचे समजले. या लसीच्या प्रयोगामध्ये सहभाग असणे, हे अत्यंत आनंददायी आहे. आपणही या संकटात खारीचा वाटा उचलत असल्याचे समाधान मोठे आहे.









