कोरोनाने शूटिंगवर परिणाम : पुस्तकात रमली कलावंत मंडळी, अन्य छंदांतही दंगले सारे
सुकृत मोकाशी / पुणे :
चीनमधून कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला असून, सर्व मालिका, चित्रपटांचे चित्रीकरणही थांबविण्यात आले आहे. मात्र, ‘क्वारंटाईन टाईम’मध्ये वेगवेगळय़ा पुस्तकांमध्ये रमत कलावंत मंडळीं आपला वेळ सत्कारणी लावत आहेत. त्याचबरोबर घराची साफसफाई व अन्य छंदांमध्येही काही कलाकार दंगले असून, या आपत्तीने त्यांना स्पेस मिळत असल्याचेही दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळय़ाच मालिका, चित्रपटांचे शूटिंग 31 मार्चपर्यंत थांबविण्यात आले आहे. त्यामुळे सगळेच कलाकार आपापल्या घरात बसून आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’ने कलाकारांशी संवाद साधला. दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, सध्या मी माझ्या घरात बसून आहे. 15 ते 20 मार्चदरम्यान माझ्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे शूटिंग होते. ते थांबविले आहे. पण, चित्रपटाचे जेवढे शुटिंग झाले आहे, त्याचे एडिटिंग करत आहे. पुस्तक वाचनाची आवड असल्याने पुस्तकांचे वाचन सुरू आहे. सध्या मी वसंत लिमये यांचे ‘विश्वास’ हे पुस्तक वाचत आहे. एका पुस्तकाच्या लिखाणाचे काम सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून मी घराबाहेर पडलो नाही. त्याचबरोबर कुटुंबाला वेळ देणे सुरू आहे.
सुबोध भावे म्हणाले, सध्या घरी कुटुंबाला वेळ देणे सुरू आहे. मुलांबरोबर घरात खेळणे, घर आवरणे यात वेळ घालवतो. सध्या कुमार गंधर्व यांच्यावरील पुस्तकाचे वाचन सुरू आहे. कोरोनाला घालविण्यासाठी सरकार आणि तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
सागर देशमुख म्हणाले, कोरोनामुळे सर्व शूटिंग थांबविले आहे. घरातच असल्याने फिल्म्स् बघणे, पुस्तके वाचणे अशी दिनचर्या आहे. तसेच माझे छंद मी जोपासत आहे. धनश्री काडगावकर म्हणाली, बऱयाच दिवसांनी घरी आले आहे. सकाळी स्वयंपाक करायला हातभार लावते. त्यात रमत नाही. पण, बेसिक स्वयंपाक करता येतो. दुपारच्या वेळेत ज्यातून शिकायला मिळेल, असे सिनेमे पाहत असते. वाचन सुरू असते. जीमला जात नाही. घरी ट्रेनर येतो, त्याच्यासोबत ट्रेनिंग सुरू असते. स्वतःची काळजी घेत आहे. माझ्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. त्या करत आहे.
संपर्क ठेवण्यापेक्षा छंद जपूयात : मृणाल दुसानीस
मृणाल दुसानीस म्हणाली, कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सध्या मी विजया मेहता यांचे ‘झिम्मा’ पुस्तक वाचत आहे. इशा केसकर म्हणाली, माझ्याकडील घरकाम करणाऱया मावशींना सुट्टी दिली आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक काम मी करते. त्याने व्यायामही होतो. घरात दोन मांजरी आहेत. त्यांच्याशी खेळणे, गाणी ऐकणे असे छंद जोपासत आहे. पुस्तकांचे वाचन सुरू आहे. बाहेर जाणे टाळत आहे. लोकांना अजून गांभीर्य नाही. हलगर्जीपणा होत आहे. त्यामुळे जे लोक चांगले आहेत, त्यांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे संपर्क न ठेवणे हाच कोरोनावर उपाय आहे.









