खासगी इस्पितळांकडून होणाऱया भरमसाठ वसुलीला चाप
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना संसर्गबाधित रुग्णांसाठी सिटी स्कॅन किंवा एक्स-रे आवश्यक असल्याने राज्य सरकारने खासगी इस्पितळे आणि लॅबोरेटरिजसाठी दर निश्चित केले आहेत. त्यानुसार सिटी-स्कॅनसाठी 1500 रुपये आणि डिजिटल एक्स-रे साठी 250 रुपये आकारता येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
कोरोनाबाधितांच्या तपासणीच्या नावाखाली काही खासगी इस्पितळे रुग्णांकडून दुप्पट वसुली करत आहेत. याला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी आदेशपत्रक जारी करून सिटी स्कॅन आणि एक्स-रेच्या दरासंबंधीचे पत्रक जारी केले आहे. रुग्णांकडून अधिक दर आकारणी केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सरकारी इस्पितळांमध्ये सिटी स्कॅन किंवा एक्स-रे मोफत केली जाते. जनतेने याचा सदुपयोग करून घ्यावा. खासगी इस्पितळे आणि खासगी लॅबोरेटरिजनी सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक वसुली केली तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी दिला आहे.









