नवी दिल्ली
वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूने वैयक्तिक कारणास्तव थॉमस व उबेर चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. डेन्मार्कमधील सुपर 750 स्पर्धेतही ती सहभागी होणार नाही, असे संकेत आहेत. यापैकी थॉमस व उबेर चषक स्पर्धा पुढील महिन्यात होत आहे.
आर्हुस, डेन्मार्क येथे दि. 3 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत थॉमस व उबेर चषक स्पर्धा आयोजित केली गेली आहे. त्यानंतर काहीच दिवसात डेन्मार्क ओपन (13 ते 18 ऑक्टोबर) व डेन्मार्क मास्टर्स (20 ते 25 ऑक्टोबर) या स्पर्धा होणार आहेत. सुधारित टेनिस कॅलेंडरनुसार थॉमस व उबेर चषक ही पहिलीच आयोजित स्पर्धा आहे.
सिंधूने मागील महिन्यापासून कोरियन प्रशिक्षक पार्क ते-सँग यांच्या मार्गदर्शनानुसार, सरावाला सुरुवात केली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने 1 ऑगस्टपासून ऑलिम्पिकसाठी महत्त्वाच्या 8 खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात भाग घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर सिंधू कोर्टवर उतरली.
सिंधूशिवाय वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेता बी. साई प्रणित, माजी विश्व अव्वलमानांकित किदाम्बी श्रीकांत, महिला दुहेरीतील खेळाडू एन. सिक्की रेड्डी हे साई-पुलेला गोपीचंद अकादमीत सराव करत आहेत.
अलीकडेच कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झालेला सात्विकराज आंध्र प्रदेशमधील अमलापूरम येथील आपल्या निवासस्थानी आहे तर त्याचा पुरुष दुहेरीतील सहकारी चिराग शेट्टी मुंबईत आहे. अश्विनी पोनप्पाने बेंगळूरमध्ये थांबणे पसंत केले. ती पदुकोण-द्रविड सेंटर ऑफ स्पोर्टस् एक्सलन्समध्ये सराव करत आहे.
लंडन ऑलिम्पिक कांस्यजेती व माजी विश्व अव्वलमानांकित सायना नेहवालने अद्याप प्रशिक्षण शिबिरात भाग घेतलेला नाही. ती स्वतंत्र ठिकाणी पती परुपल्ली कश्यप व अन्य काही खेळाडूंसमवेत सराव करत आहेत.









