वृत्तसंस्था/ हैद्राबाद
बँकॉक येथे विश्व बॅडमिंटन फेडरेशनची थायलंड खुली सुपर-1000 पुरूष आणि महिलांची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा मंगळवारपासून सुरू होत आहे. एक लाख डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या टॉप सीडेड पी.व्ही सिंधूची गाठ सायना नेहवालशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे गेल्या वर्षीच्या मार्चनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व बॅडमिंटन स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. गेल्यावर्षी 15 मार्च रोजी अखिल इंग्लंड खुली बॅडमिंटन स्पर्धा शेवटची झाली होती. दरम्यान गेल्या ऑक्टोबरमध्ये डेन्मार्क खुली आणि अन्य दोन लहान स्पर्धा झाल्या होत्या. बँकॉकमध्ये ही पहिलीच स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतून चीन आणि जपान संघानी माघार घेतली असली तरी इतर देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. थायलंडमधील या स्पर्धेत पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, के.श्रीकांत, सौरभ वर्मा, एच.एस. प्रणॉय, समीर वर्मा यांचा भारतीय संघात समावेश आहे.









