बहुतेक बाजारपेठा सुरळीत सुरू : आघाडीच्या नेत्यांकडून हत्याकांड निषेधार्थ रॅली
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्ग जिल्हय़ात अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्हय़ातील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी एकत्र येत निषेध रॅली काढली व हत्याकांडातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला होता. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही बंद यशस्वी करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले होते. या बंदला फार कमी प्रतिसाद मिळाला.
जिल्हय़ातील बहुतेक बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या. फार कमी प्रमाणात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बाजारपेठांमध्ये फिरून काही काळापुरती शेतकऱयांसाठी दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन केल्यानंतर काही बाजारपेठांमध्ये दुपारपर्यंत काही दुकाने बंद ठेवण्यात आली व पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे बंदचा काहीच परिणाम जाणवला नाही.
कणकवलीत शिवसेना आमदार वैभव नाईक व इतर नेत्यांनी बाजारपेठांमध्ये फिरून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, दोडामार्ग या शहरांमध्ये रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. निषेधच्या घोषणा देण्यात आला. शेतकऱयांवर होणारा अत्याचार सहन करणार नाही. हत्याकांडामधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला. प्रत्येक तहसील कार्यालयासमोर निदर्शने करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर विरोधकांनी बंद सपशेल अयशस्वी ठरला असून आघाडीच्या नेत्यांनी केवळ स्टंटबाजी केली. बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. यावरून महाविकास आघाडीची ताकद ताकद कमी झाली असल्याचे स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.









