मालवण
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असताना भारतीय पुरातत्व विभागाने आपल्या अखत्यारीतील राज्यातील ऐतिहासिक वास्तू 15 मे पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्गचे दरवाजे पर्यटकांसाठी 15 मेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पुरातत्वचे विभागीय अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.
कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असल्याने सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ला पर्यटकांना फिरण्यासाठी पूर्णत: करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 मेपर्यंत अथवा पुढील आदेश होईपर्यंत हे दोन्ही किल्ले बंद राहणार आहेत. किल्ले सिंधुदुर्गबाबत बंदर विभागाच्या अधिकाऱयांना पत्र पाठविण्यात आले असल्याचे चव्हाण म्हणाले. गत पर्यटन हंगामातही पर्यटन व्यवसायाला कोरोनाचा मोठा फटका बसला होता. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीपासून पुन्हा एकदा कोरोनामुळे पर्यटन कोलमडले आहे.









