बांदा
प्रतिनिधी
कोव्हिड 19 महामारीमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था खालावत आहे मात्र असे असतानाही सिंधुदुर्ग ते गोवा अशी खडीची ओव्हरलोड वाहतूक करून काही कंपन्या करचुकवेगिरी करत आहेत. यात दोन ब्रासची रॉयल्टी भरून चार ब्रासची वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवून आपल्या तिजोऱ्या भरत आहेत. सदरची वाहतूक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इन्सुली चेकपोस्ट वरून राजरोसपणे जात आहे याबाबत वेळोवेळी सांगूनही संबधीत अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तरी आपण या मार्गावरून गोव्यात जाणारी अनधिकृत ओव्हरलोड खडी वाहतूक येत्या सात दिवसात बंद करावी अन्यथा इन्सुली ग्रामस्थांच्या व डंपर चालक मालक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडावे लागेल असा इशारा साईप्रसाद नारायण राणे यांनी दिला आहे त्या प्रकारचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ओरस यांना दिले आहे या निवेदनात राणे यांनी म्हटले कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड खडी वाहतूक करण्यात येते.यात सोनुर्ली येथील एमव्हीआर कंपनी, सावंतवाडी माडखोल येथील आरएमसी कंपनी, इन्सुली येथील यानी इन्फ्रास्टकचर, तसेच वेत्ये येथील सहस्त्र इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी ची मोपा विमानतळ कामासाठी वाहतूक सुरु आहे. वरील कंपनीच्या ओव्हरलोड व अनधिकृत वाहतुकीमुळे रस्त्यावरून लोकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच या वाहतुकीमुळे अपघात सुद्धा वाढले आहेत.सदरची वाहने भरधाव धावत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका आहे.तरी याबाबत वेळोवेळी सदरची बाब निदर्शनास आणून दिली तरी कार्यालय मात्र त्याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे येत्या सात दिवसात हि अनधिकृत ओव्हरलोड वाहतूक बंद न केल्यास आम्ही आंदोलन छेडणार असा इशारा साईप्रसाद नारायण राणे यांनी दिला आहे