विजापूर ./ वार्ताहर
दोन मंदिरांमध्ये चोरटय़ांनी 2 लाख 54 रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. सिंदगी तालुक्यातील कन्नोळीमधील लक्ष्मी भाग्यवंती मंदिर व लक्कम्मा देवी मंदिरात गुरुवारी पहाटे या चोरीच्या घटना घडल्या आहेत. लक्ष्मी भाग्यवंती मंदिरात सोन्याचे बोरमाळ, मंगळसूत्र, चांदीचे किरीट, जोडवी असा एकूण 2 लाख 22 हजार तर लक्कम्मा देवी मंदिरातील देवीचे मंगळसूत्र, जोडवी असे एकूण 32 हजारचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, गुरुवारी पहाटे चोरटय़ांनी कन्नोळी गावात प्रवेश केला. त्यानंतर गावातील मंदिरांना लक्ष्य करत प्रथम लक्ष्मी भाग्यवंती मंदिरात चोरी केली. त्यानंतर लक्काम्मा देवी मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारून फरार झाले. दरम्यान, सकाळी नागरिक देवीच्या दर्शनासाठी आले असता त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर सदर चोरीची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच इंडीचे डीएसपी एस. एच. संगद, सिंदगीचे सीपीआय एच. एम. पटेल, पीएसआय एस. एम. होसमनी यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.









