93 पैकी 83 ठिकाणी विजय : प्रीतम सिंगांच्या पक्षाला लक्षणीय यश
वृत्तसंस्था/ सिंगापूर
सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्या पीपल्स ऍक्शन पार्टीने सत्ता टिकविली आहे. पीएपीने शुक्रवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 93 पैकी 83 मतदारसंघांमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 68 वर्षीय पंतप्रधान ली हे स्वतःच्या ग्रूप रिप्रेझेंटेशन कॉन्स्टीटय़ूएंसीमधून (जीआरसी) पुन्हा निवडून आले आहेत. तर उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट देखील पुन्हा विजयी झाले आहेत.
भारतीय वंशाचे नेते प्रीतम सिंग यांच्या नेतृत्वाखालील वर्कर्स पार्टीने सेंगकांगच्या जीआरसी समवेत 10 जागांवर विजय प्राप्त केला आहे. सेंगकांग जीआरसीपीमध्ये पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री एन ची मेंग यांच्या नेतृत्वाखालील पीएपी टीमला त्यांनी पराभूत केले आहे. वर्कर्स पार्टीला 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 6 जागांवर यश मिळाले होते. सिंगापूरमध्ये भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे.
सुमारे 26.5 लाख मतदारांनी चेहऱयावर मास्क आणि हातात ग्लोव्हज् घालून मतदान केले आहे. संसदेच्या 93 मतदारसंघांसाठी 192 उमेदवार उभे राहिले होते. पीएपी स्वातंत्र्योत्तर काळात पूर्ण बहुमतासह सिंगापूरमध्ये सदैव सत्तेत राहिला आहे. कोविड-19 च्या अभूतपूर्व आव्हानादरम्यान पीएपी समवेत 11 राजकीय पक्षांनी 9 दिवसांपर्यंत प्रचार केला आहे. जागतिक महामारीमुळे मतदान सुरक्षित रहावे याकरता मतदान केंद्रांची संख्या 880 वरून वाढवत 1,100 करण्यात आली होती.
पंतप्रधान ली यांनी मागील महिन्यात मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली होती. ली यांच्या पीएपीने 1950 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत विजय मिळविला आहे. सर्व 93 जागांवर उमेदवार उभे करणारा पीएपी एकमात्र पक्ष ठरला आहे. सप्टेंबर 2015 च्या निवडणुकीत पीएपीने 89 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि यातील 83 जणांना विजय मिळविता आला होता. देशाचे तिसरे पंतप्रधान ली यांनी 2004 पासून शासनाचे नेतृत्व केले आहे. त्यांचे वडिल ली कुआन येव हे सिंगापूरचे पहिले पंतप्रधान होते.









