हायटेक रोबोट फूड अन् ग्रोसरीची करतोय डिलिव्हरी
सिंगापूरमध्ये कोरोनामुळे ड्रायव्हरलेस डिलिव्हरीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. सध्या तेथील रस्त्यांवर रोबोट दैनंदिन गरजेच्या सामग्रीपासून खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करताना दिसून येतात. सरकारने फेब्रुवारीमध्ये 700 घरांच्या पुंगगोलमध्ये दोन रोबोट्सच्या मदतीने परीक्षण सुरू केले होते. त्यानंतर फूडपांडा कंपनीने 200 हेक्टरमधील नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीत (एनटीयू) फूड आणि ग्रोसरी उत्पादनांच्या डिलिव्हरीसाठी 4 रोबोट तैनात केले. फूडपांडाची प्रतिस्पर्धी कंपनी ग्रॅबने रेस्टॉरंटमध्ये डिलिव्हरीसाठी रोबोट रनर सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली आहे.
संपर्करहित डिलिव्हरी ही काळाची गरज आहे. यामुळे आम्हाला डिलिव्हरी क्षमता वाढविणे आणि किफायतशीर खर्चात प्रभावी पद्धतीने ग्राहकांची सेवा करण्यास मदत मिळणार आहे. हे परीक्षण नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण सिंगापूरमध्ये रोबोटच्या मदतीने डिलिव्हरी करणार आहोत. या सेवेमुळे प्रतीक्षेचा वेळ 5-15 मिनिटांपर्यंत कमी होईल अशी अपेक्षा आहे. एका रोबोट वाहनातून 100 बॉक्सची वाहतूक होऊ शकते असे फूडपांडाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
एनटीयूत तैनात मोबिलिटी रोबोट्सना भविष्यात नॅशनल युनिव्हर्सिटीजमध्ये स्टाफ आणि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मोबाइल स्टोअरमध्ये बदलण्याची योजना आहे. यासंबंधीचा निर्णय जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत चालणाऱया परीक्षणानंतर घेतला जाईल.
फूडपांडाचा फूडबॉट एआयच्या मदतीने संचालित होतो. याकरता स्पेशल ट्रक तयार करण्यात आले आहेत. यातील कॅमेरा डोळे म्हणून तर सॉफ्टवेअर मेंदूप्रमाणे काम करतो. पुंगगोलमध्ये 700 रहिवाशांदरम्यान हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. रोबोट डिलिव्हरीसाठी ग्राहकाने दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो. लोकेशनवर पोहोचताच ग्राहकाच्या मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवितो. रोबोटकडून ऑर्डर प्राप्त करण्यासाठी ग्राहकाला रोबोटमधील कॅमेऱयासमोर स्वतःच्या ऑर्डरचा पुरावा दाखवावा लागतो. त्यानंतर ओटीपीच्या मदतीने ग्राहक स्वतःचा बॉक्स उघडून सामग्री प्राप्त करू शकतो.









