वार्ताहर / एकंबे :
सिंगापूर-मलेशिया येथे स्वस्तात सहल घडविण्याचे अमिष दाखवून सेवानिवृत्त शिक्षकासह ज्येष्ठ नागरिक व इतर अशा 28 जणांकडून 8 लाख 70 हजार रुपये ऍडव्हान्स घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अंबरनाथ (जि. ठाणे) येथील श्रीकांत विष्णू सोनावणे व ललना श्रीकांत सोनावणे या पती-पत्नीविरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक विलास शंकर भोसले यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, श्रीकांत विष्णू सोनावणे व ललना श्रीकांत सोनावणे, (रा. क्वार्टर नं. 6 सी, 3 पनवेलकर कॅप्सूल, ल. खा. माने नगर, कोंडुजगाव, अंबरनाथ पश्चिम, जिल्हा ठाणे) यांनी ब्ल्यु वर्ल्ड हॉलिडेज कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमार्फत कोरेगावातील दोन नामांकित डॉक्टरांच्या ग्रुपला परदेश सहल घडविली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर या पती-पत्नीने कोरेगावसह जिल्ह्यातील काही जणांशी संपर्क साधून प्रति व्यक्ती 65 हजारात परदेश सहल घडविण्याचे अमिष दाखविले. ऍडव्हान्स पोटी प्रत्येकाकडून 30 रुपये घेण्यात आले. 17 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई विमानतळावरुन सहलीला जाऊ, असे सांगण्यात आले. मात्र, एकामागे एक वायदे देत ते वेळोवेळी बदलल्याने नागरिकांनी पैसे परत मागितले. त्यांना चेक देण्यात आले, मात्र ते न बँकेत वटल्याने विलास भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीकांत विष्णू सोनावणे व ललना श्रीकांत सोनावणे यांच्या विरुद कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे अधिक तपास करत आहेत.









