रशियन राजदूतांची माहिती- द्विपक्षीय बोलणी प्रगतीपथावर असल्याची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशियाची सिंगल डोस व्हॅक्सिन स्पुटनिक-लाइट लवकरच भारतात दाखल होण्याचे स्पष्ट संकेत रविवारी मिळाले. भारतातील रशियन राजदूत एन. कुडाशेव यांनी याबाबतची माहिती देत द्विपक्षीय बोलणी प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. सध्या भारताला स्पुटनिक-व्ही ही दोन डोसची रशियन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लसीचे भारतात उत्पादन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच स्पुटनिकची सिंगल डोस लस लवकरच भारताला देण्याची योजना आहे, असे एन. कुडाशेव यांनी सांगितले.
रशियन बनावटीच्या स्पुटनिक-व्ही या लसीचा प्रभावीपणा जगात सर्वज्ञात आहे. 2020 च्या उत्तरार्धात रशियामध्ये सुरू झालेल्या लोकांच्या लसीकरणात याचा यशस्वीरित्या उपयोग करण्यात आला आहे. ही लस कोरोनाच्या नव्या प्रकारांवरही प्रभावी असल्याचे रशियन तज्ञांनी जाहीर केले आहे. ही लस भारतात उपलब्ध झाली असून चालू आठवडय़ापासून त्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. स्पुटनिक-व्ही या लसीमुळे भारतातील लसींची संख्या तीन इतकी झाली आहे. देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान लसीचा तुटवडा जाणवत आहे. भारतात सध्या सीरम संस्थेची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे.
स्पुटनिक लाइट लसीविषयी…
कोरोनाविरुद्ध रशियाने सिंगल डोस लसीची निर्मिती केली आहे. हीच लस ‘स्पुटनिक लाइट’ या नावाने ओळखली जाते. कोरोनाविरुद्ध ही सिंगल डोस लस 80 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘लाइट’ व्हर्जन लस ही दोन डोसवाल्या लसींपेक्षा एकाच डोसमध्ये प्रभावी ठरते, असा दावा कंपनीने केला आहे. स्पुटनिकच्या या लाइट आवृत्तीच्या वापरालाही रशियन सरकारने मान्यता दिली आहे.
भारतात आपत्कालीन वापरास मान्यता
एप्रिलमध्ये, रशियन कोरोना लस ‘स्पुटनिक व्ही’च्या आपत्कालीन वापरास भारतात मान्यता देण्यात आली. सेंट्रल मेडिसिन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या तज्ञ समितीने देशातील काही अटींसह रशियन कोरोना लस ‘स्पुटनिक-व्ही’च्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती, याला भारतीय औषध नियंत्रक (डीसीजीआय) ने मान्यता दिली आहे. तसेच भारताने अलीकडेच डब्ल्यूएचओकडून संमती मिळालेली कोणतीही लस आयात करण्याची अनुमती दिलेली असल्याने स्पुटनिक लाइट या लसीच्या आयातीतही कोणतीही कायदेशीर अडचण येणार नसल्याचे मानले जात आहे.









